काश्‍मीरमधून आणलेला 32 लाखांचा चरस हस्तगत ; तिघांना बेड्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

जम्मू-काश्‍मीर येथून ठाण्यात विक्रीसाठी आणलेला तब्बल 32 लाखांचा चरस ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केला. याप्रकरणी मुंब्य्रातील एकासह काश्‍मीरमधील दोघांना अटक केली.

ठाणे : जम्मू-काश्‍मीर येथून ठाण्यात विक्रीसाठी आणलेला तब्बल 32 लाखांचा चरस ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केला. याप्रकरणी मुंब्य्रातील एकासह काश्‍मीरमधील दोघांना अटक केली. या कारवाईत एकूण 15 किलो 700 ग्रॅम शुद्ध चरस असून, काही अमली पदार्थांचा कच्चा मालही आहे. अटक आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

मुंब्रा, मित्तल ग्राऊंड येथील सार्वजनिक शौचालयासमोर चरस विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, 1 मार्चला पोलिसांनी सापळा रचून साजिद हसन खान ऊर्फ मुसा (38 रा. अमृतनगर, मुंब्रा), अब्दुल समद अब्दुलरजा गुजली (55 रा. पोस्ट-संबल बंदिपुरा, जम्मू-काश्‍मीर) आणि मोहम्मद मकबूल मुक्तभट (55 रा. गंधारबल जिल्हा, जम्मू-काश्‍मीर) यांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 730 रुपयांसह 15 किलो 700 ग्रॅम चरस हस्तगत केला. भारतीय बाजारपेठेत सुमारे 2 लाख रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या या मुद्देमालाची किंमत एकूण 32 लाख 40 हजार 730 रुपये आहे. 

दहावीपर्यंत शिकलेला मुसा हा मुंब्य्रातील स्थानिक आहे. तो अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी शिक्षा भोगलेल्या मुंबईतील आरिफ सय्यद याचा नातलग आहे. तर, सहावीपर्यंत शिकलेल्या गुजलीवर मुंबईतील वरळी पोलिस ठाण्यात अमली पदार्थांच्या तस्करीचा गुन्हा दाखल आहे. तिसरा मुक्तभट हा अशिक्षित आहे. या तिन्ही आरोपीविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात अमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी दिली.  

 
 

Web Title: Marathi News Mumbai News 32 lakh Smuggling 3 Man Arrested