औरंगाबादचे पोलिस आयुक्‍त सक्‍तीच्या रजेवर - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबई - औरंगाबाद कचरा आंदोलनातील आंदोलकांवर लाठीचार्ज आणि दगडफेक केल्या प्रकरणी औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

मुंबई - औरंगाबाद कचरा आंदोलनातील आंदोलकांवर लाठीचार्ज आणि दगडफेक केल्या प्रकरणी औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की औरंगाबादच्या घटनेबद्दल सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. अनेक गोष्टी या ठिकाणी मांडण्यात आल्या. त्या गंभीर आहेत. या मुद्द्यावर सभागृहाची भावना लक्षात घेता औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल. या प्रकरणाची गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्या समितीच्या माध्यमातून एका महिन्यात चौकशी करण्यात येईल.

औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंदोलनात स्थानिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील; मात्र ज्यांनी पोलिसांना मारहाण केली, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या वेळी चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर यांनी भाग घेतला.

Web Title: marathi news mumbai news aurangabad police commissioner on leave devendra fadnavis