दारिद्य्र रेषेवरील शेतकऱ्यांना स्वस्तात धान्य ; 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फायदा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

राज्यातील 14 जिल्ह्यांतील दारिद्य्र रेषेवरील शेतकऱ्यांना स्वस्त अन्नधान्याचा लाभ घेता येणार आहे. तांदूळ आणि गहू शिधा केंद्रावर देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यातील 14 जिल्ह्यांतील दारिद्य्र रेषेवरील शेतकऱ्यांना स्वस्त अन्नधान्याचा लाभ घेता येणार आहे. तांदूळ आणि गहू शिधा केंद्रावर देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी 922 कोटींची आर्थिक तरतूदही केली आहे. राज्यातील एकूण 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या अन्नधान्याचा लाभ घेता येईल. 

राज्यातील औरंगाबाद, नागपूर, अमरावती या तीन विभागांतर्गत शेतकरी या एपीएल योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली आहे. एपीएल योजनेचे अधिक लाभार्थी या तीन विभागांत असल्याने ही योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. तांदूळ प्रति किलो दोन, तर गहू प्रति किलो तीन रुपयांनी एपीएल ग्राहकांना शिधापत्रिकेवर देण्यात येणार आहे. 

वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण 

अन्न नागरी पुरवठा विभागाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरणाचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे. त्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 5 कोटी 41 लाखांची तरतूद केली आहे. आधार क्रमांक शिधापत्रिकेशी लिंक करण्याचा महत्त्वाचा प्रकल्प अन्न नागरी पुरवठा विभागाने हाती घेतला आहे.

त्यामुळे 10 लाख शिधापत्रिका चुकीच्या आढळून आल्या आहेत; तसेच या शिधापत्रिका रद्दही केल्या आहेत. 2016 नंतर 92 लाख नव्या गरजू लाभार्थींना शिधापत्रिका दिल्या आहेत. 

Web Title: Marathi News Mumbai News Backward Poverty Line Farmers Get Low Cost Meal