लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पाली फाट्याजवळ खासगी वाहनांकडून लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेने रस्त्यावर पडलेल्या या दुर्दैवी प्रवाशाला आणखी एका मोटारीने चिरडले. 

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पाली फाट्याजवळ खासगी वाहनांकडून लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेने रस्त्यावर पडलेल्या या दुर्दैवी प्रवाशाला आणखी एका मोटारीने चिरडले. 

मानाजी यादव, (वय 52; रा. रिलायन्स टाऊनशिप, नागोठणे) असे मृताचे नाव आहे. ते काल शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास द्रुतगती महामार्गावर उभे होते. ते पुण्याला जाण्यासाठी वाहनचालकांकडून लिफ्ट मागत होते. त्या वेळी त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते महामार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेवर फेकले गेले. त्याचदरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या गाडीखाली ते सापडले आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व खोपोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकारी खेबुडे यांनी पंचनामा करून सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले, रवी दिघे, मोहन केदार, शुभम साठेलकर यांच्या मदतीने खालापूर येथे विच्छेदनासाठी मृतदेह नेला. 
 

Web Title: marathi news mumbai news crime news one died