पत्नी रुचकर जेवण करीत नाही, यावर घटस्फोट अशक्य: न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

सांताक्रूझमध्ये राहणाऱ्या पतीने पत्नीच्या विरोधात कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचा दावा केला होता. पत्नी घरामध्ये रुचकर जेवण बनवत नाही, घरामधील कामे करीत नाही; त्यामुळे माझा क्रूर छळ होत आहे, म्हणून मला घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी पतीने याचिकेत केली होती.

मुंबई : घरातील कामे करणारी कर्तव्यदक्ष पत्नी नसल्याच्या कारणावरून घटस्फोट द्या, अशी मागणी करणाऱ्या पतीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. नोकरी करणाऱ्या पत्नीसाठी घरातील कामे ही अतिरिक्त असतात. ती केली नाहीत म्हणून पत्नीचा छळ केला, असे होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. 

सांताक्रूझमध्ये राहणाऱ्या पतीने पत्नीच्या विरोधात कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचा दावा केला होता. पत्नी घरामध्ये रुचकर जेवण बनवत नाही, घरामधील कामे करीत नाही; त्यामुळे माझा क्रूर छळ होत आहे, म्हणून मला घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी पतीने याचिकेत केली होती. कुटुंब न्यायालयाने ही मागणी अमान्य करून पतीचा घटस्फोटाचा दावा फेटाळला होता. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका केली होती.

याचिकेवर न्या. के. के. तातेड आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. पत्नी म्हणून घरामधील कामे करण्याची जबाबदारी पार पाडण्यात ती अपयशी ठरत आहे, ती घरामध्ये रुचकर आणि पुरेसे जेवण करीत नाही आणि घरदेखील सांभाळत नाही, तिला माझ्यासाठी वेळ नसतो आणि मी जेव्हा घरी येतो, तेव्हा ती मला पाणीदेखील देत नाही. त्यामुळे मला घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी त्याच्या वतीने करण्यात आली होती. पत्नीने या आरोपांचे खंडन केले. नोकरीला जाण्यापूर्वी घरामधील कामे आणि जेवण करूनच निघते; मात्र तरीही सासरची मंडळी वाईट पद्धतीने वागवतात, असे पत्नीच्या वतीने सांगण्यात आले. त्याचबरोबर तिची बाजू मांडण्यासाठी पतीकडील काही नातेवाईक आणि शेजाऱ्यांची साक्षही तिने दाखल केली. याचिकादाराची पत्नी नेहमीच घरामध्ये काम करीत असते आणि आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा ती काही ना काही कामे करीतच असते, अशी जबानी नातेवाईकांनी न्यायालयात दिली आहे. न्यायालयानेही पत्नीची बाजू ग्राह्य मानली आहे. पत्नी घरी काम करीत नाही किंवा वाईट वागते, असे साक्षी-पुराव्यावरून आढळत नाही आणि ती घरामध्ये काम करीत नाही किंवा पतीच्या गरजा पूर्ण करीत नाही, अशी कारणेदेखील घटस्फोट मिळण्यासाठी पुरेशी नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. कुटुंब न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट करीत खंडपीठाने पतीची याचिका फेटाळली. 

पाण्याची अपेक्षा नको 
पत्नी नोकरी करते आणि तिच्यासाठी घरामध्ये रोज सकाळ-संध्याकाळ जेवण तयार करणे, नोकरीहून येताना भाज्या आणणे, किराणा सामान आणणे ही कामे अतिरिक्त असतात. अशा वेळेस पतीने पत्नीकडून तो कार्यालयामधून घरी आल्यावर पाणी मिळण्याची अपेक्षा करणे अयोग्य आहे, असेही न्यायालयाने सुनावले आहे. 

Web Title: Marathi news Mumbai news diverse case in Court