पिसाळलेल्या कुत्र्याने मुलाच्या तोंडाचे लचके तोडले, मुलाची प्रकृती चिंताजनक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

उल्हासनगरात मध्यवर्ती शासकीय व शासकीय महिला प्रसूतिगृह असे दोन रुग्णालये आहेत. जानेवारी महिन्यात मध्यवर्तीमध्ये भटक्या कुत्र्यांनी लचके तोडलेल्या 831 तर प्रसूतिगृहात 350 ते 400  रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांना रेबीजची इंजेक्शने देण्यात आलेली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर यांनी दिली.

उल्हासनगर : एका पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांचा चावा घेताना 2 वर्षीय मुलाच्या तोंडाचे लचके तोडल्याची घटना घडली. ही घटना हिल लाईन पोलिस ठाण्याच्या मागील परिसरात घडली. या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काल सायंकाळी हिल लाईन पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या वसाहतीत एका पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांचा चावा घेतला आणि अंगणात खेळत असणाऱ्या कुणाल विनोद निकम या दोन वर्षीय मुलावर हल्ला करून त्याच्या तोंडाचे लचके तोडले. कुणालला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सायन येथे पाठवण्यात आले. मात्र, सायन रुग्णालयात रेबीज इंजेक्शन आणि पुढील उपचारांची सोय नसल्याचे कारण सांगून त्याला केईएमला पाठवण्यात आले.

दरम्यान, कुत्र्याच्या हल्ल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याचा पाठलाग करून माणेरा गावात गाठले आणि त्याला ठार मारले.

केईएमच्या डॉक्टरांनी कुणालच्या नातेवाईकांना कुत्र्याची माहिती घेण्यास मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवले. महात्मा फुले योजनेचे डॉ सतीश गंगावणे यांनी केईएमच्याच्या अधिष्ठाता यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. यावेळी शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे कल्याण लोकसभा अध्यक्ष भरत खरे उपस्थित होते.

Web Title: Marathi News Mumbai News Dog Bites A child condition Critical