विजेचा शॉक लागून चिमुरडी जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

''विद्युत खांब व तारांच्याजवळील फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. पीडित मुलीस नुकसानभरपाई मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे''.

- ज्ञानेश्वर वट्टमवार, उप अभियंता

वाडा : करवंद खाण्यासाठी झाडावर चढलेल्या मुलीला विजेचा शॉक लागल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शेले-धापड गावातील पाचवीत शिकणारी प्रियंका प्रकाश खांजोडे ही शनिवारी शाळा सुटल्यानंतर करवंद खाण्यासाठी झाडावर चढली. त्या झाडाची फांदी शेजारून जाणाऱ्या विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून ती लांब फेकली गेली. यात तिचा हात, पाय व मांडीला भाजल्याने ती गंभीर जखमी झाली. 

तिला तत्काळ वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. वेल आणि झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला; मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांनी केला. याबाबत वीज वितरण कंपनीचे उप अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार म्हणाले की, विद्युत खांब व तारांच्याजवळील फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. पीडित मुलीस नुकसानभरपाई मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

Web Title: Marathi News Mumbai News Electric Shock Child Injury

टॅग्स