लिव्ह इन रिलेशनशिप ; वडिलांचे नाव लावू देण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेल्या मुलाने जन्मदाखल्यावर वडिलांचे नाव लावू देण्यासंदर्भात केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच नामंजूर केली.

मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेल्या मुलाने जन्मदाखल्यावर वडिलांचे नाव लावू देण्यासंदर्भात केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच नामंजूर केली. आईने वडिलांचे नाव जन्मदाखल्यामधून वगळण्याचा निर्णय वीस वर्षांपूर्वी घेतला होता. न्यायालयाने या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. 

नवी मुंबईत राहणाऱ्या 20 वर्षांच्या मुलाने वडिलांचे नाव अधिकृतपणे जन्मदाखल्यासह अन्य सर्व सरकारी आणि शाळा-महाविद्यालयाच्या कागदपत्रांमध्ये नोंद करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र, आईने न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये वडिलांचे नाव का वगळले, याचा खुलासा केला होता. कामाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या याचिकादाराच्या आई-वडिलांनी वीस वर्षांपूर्वी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यातूनच या मुलाचा जन्म झाला; मात्र लग्न न केल्यामुळे त्यांनी मुलाच्या जन्मदाखल्यावर आणि अन्य कागदपत्रांवर वडिलांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. 

न्यायालयाने आईच्या प्रतिज्ञापत्राची नोंद घेत मुलाची मागणी अमान्य केली. वडिलांचे नाव लावल्यामुळे त्यासंदर्भातील आरक्षण आणि अन्य लाभ मिळू शकतात, असा दावा याचिकादाराच्या वतीने करण्यात आला होता; मात्र या आईच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका नामंजूर केली. 
 

Web Title: Marathi News Mumbai News Fathers name Leave in Relationship