मुलुंडमधील बिबट्या अखेर सहा तासांनी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास बिबट्या नानेपाडा भागात आल्यामुळे मुलुंडमध्ये चांगलीच खळबळ उडाली. वनअधिकाऱ्यांनी इमारतीमध्ये लपलेल्या बिबट्याला शिताफीने जेरबंद केल्यामुळे मागील सहा तासांहून अधिक काळ निर्माण झालेला तणाव निवळला.

मुंबई - मुलुंडमधील नानेपाडा येथे घुसलेल्या बिबट्याला अखेर सहा तासांनंतर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास बिबट्या नानेपाडा भागात आल्यामुळे मुलुंडमध्ये चांगलीच खळबळ उडाली. वनअधिकाऱ्यांनी इमारतीमध्ये लपलेल्या बिबट्याला शिताफीने जेरबंद केल्यामुळे मागील सहा तासांहून अधिक काळ निर्माण झालेला तणाव निवळला. पण मुलुंडच्या पुर्वेपासून लांब असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून थेट मुलुंड पूर्वेला निवासी वस्तीमध्ये बिबटे सर्रासपणे दिसू लागल्यामुळे मुलुंडकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

बिबट्याने एकूण सहा जणांवर हल्ला केला. याची माहिती मिळताच जखमी रूग्णांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळीच ही बातमी समजताच भाजपच्या किरीट सोमय्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एका इमारतीच्या टाकीजवळ हा बिबट्या लपून बसला होता. वन विभागाचे अधिकारी आणि पोलिस या सगळ्यांनी अथक प्रयत्न करून या बिबट्याला जेरबंद केले.

Web Title: Marathi news Mumbai news leopard captured in Mulund