नवीन वर्षातही रिक्षा चालकांची दादागिरी संपेना  

Auto
Auto

कल्याण : कल्याण डोंबिवली मधील रात्रीचा रिक्षा प्रवास जणू काही मनस्ताप असल्याचा अनेकांना अनुभव आला असून एका प्रवाशाने आपल्या सोबत घडलेला प्रसंगाचा व्हिडीओ फेसबुकवर शेयर केल्याने पुन्हा एकदा रिक्षा चालकांची दादागिरी समोर आली असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेकडील लोकग्राम परिसरात राहणारा गौतम भारद्वाज या युवकाने गुरुवारी (ता. 11) रात्री साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास मेट्रो मॉलकडे येण्यासाठी स्टेशन वरून रिक्षा पकडली. रिक्षा सुरू होताच या रिक्षा चालकाने भरधाव वेगाने रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे गौतमने रिक्षा चालकास रिक्षा हळू चालवण्यास सांगितले असता त्याने उद्धट पणे उत्तरे दिली. यावेळी रिक्षात बसलेल्या महिला प्रवाशांशी ही तो उद्धटपणे बोलत होता. गौतमने रिक्षातून उतरल्यानंतर या रिक्षा चालकाला रिक्षाभाडे दिले मात्र सुट्टे पैसे नसल्याचे कारण सांगत रिक्षाचालकाने वाद घालण्यास सुरुवात केली. रिक्षा चालकाने प्रवासी गौतमसहित त्याच्या बहिणीलाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करणाऱ्या अन्य रिक्षा चालकाला ही त्या रिक्षाचालकाने शिवीगाळ केली. हा वाईट अनुभव गौतम याने व्हिडियो चित्रीकरण करत फेसबुक वर टाकला व ती लिंक पोलीस आयुक्तालयाला पाठवली. याची पोलिसांनी दखल घेत शुक्रवारी (ता. 12) रात्री उशिरा कल्याण पूर्वमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र या घटनेमुळे पुन्हा कल्याण डोंबिवली मधील रिक्षा चालकांची दादागिरी समोर आली आहे. 

प्रवासी वर्गाशी हुज्जत घालणे, दारू पिऊन रिक्षा चालविणे, मारामारी करणे आदी रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे असल्याने या प्रकरणात ही पोलिसांचा अहवाल प्राप्त होताच संबधित रिक्षा चालकाचे लायसन्स आणि परवाना निलंबित करण्यात येणार असून दादागिरी करणाऱ्या रिक्षा चालकांची गय केली जाणार नसल्याचा इशारा कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिला आहे. 

प्रतिदिन दादागिरी आणि बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात कारवाई केली जाते, नागरिकांशी सौजन्याने वागा असे नेहमी सांगितले जाते आगामी आठवड्यात रस्ते सुरक्षा सप्ताह मध्ये रिक्षा चालकांचे प्रबोधन केले जाईल आणि आगामी आठवड्यात आरटीओ सोबत विशेष मोहीम अंतर्गत बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात गुन्हे दाखल करू अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिली.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com