मनसेने काळे झेंडे दाखवत दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

MNS
MNS

मुंबई: आज सकाळी बरोबर 10 वाजल्या पासून मनसे सैनिक मुंबादेवी येथे पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी जमले होते. वातावरण थोडे गंभीरच होते. त्याला पार्श्वभूमीही अगदी तशीच होती. पाकिस्तानच्या जेलमध्ये भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे मागील 22 महिन्यांपासून पाकिस्तानच्या जेल मध्ये आहेत. त्यांना हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली ईराण येथून ताब्यात घेण्यात आले आणि कैदेत टाकले. व्यापार व्यवसायानिमित्त गेलेल्या कुलभूषण यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग  ओढवला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ते निर्दोष असल्याचे जगासमोर मांडले पण ऐकेल तो पाकिस्तान कसला. 

नुकत्याच भारताच्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला त्यांची भेट करुन देण्याचे मान्य करीत भेटीस बोलावले. भारत व पाकिस्तानच्या अटीशर्तींप्रमाणे पाकिस्तानात भेटी दरम्यान भारतीय वकिलाती समोर त्यांना मुद्दाम वेळेत वाहन उपलब्ध करुन न देत ताटकळत ठेवणे, पाकिस्तानी मिडीयाला पाचारण करुन नको ते प्रश्न उपस्थित करीत दोघींचा अपमान करणे आदी प्रकारानंतर प्रत्यक्ष भेटी दरम्यान कुलभूषण जाधव यांना सामोरे जाणाऱ्या त्यांच्या आई व पत्नीचे सौभाग्य अलंकार मंगळ सूत्र आणि हिरवा चूड़ा काढून त्यांचे कपाळावरील कुंकू पुसून त्यांना मुला समोर आणणे अशा अत्यंत घृणास्पद वागणुक दिल्याबद्दल देशभर संतापाची लाट उठली. त्याचा उद्रेक आज मुंबादेवी येथे मनसेने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत "चाँद ताऱ्यासह असलेला पाक राष्ट्रध्वज" स्वाहा करण्यात झाला.

आज राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शालिनी ठाकरे यांच्यासह संजय नाईक, संदीप देशपांडे, शिरीष सावंत, अरविंद गावडे, केशव मुळे, शेखर गव्हाणे आणि धनराज नाईक आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी मुंबादेवी मंदिरात मनसेच्या शालिनी ठाकरे, बाळा नांदगावकर, संगीता तामोरे, मंगला अड़सूळ, धनराज नाईक यांनी मुंबादेवीचे दर्शन घेऊन कुलभूषण जाधव यांची लवकरात लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना करीत देवीची खणा नारळाने ओटी भरली. तेथून मनसेचा पाकिस्तानच्या निषेधाचा मोर्चा जवळच केलेल्या सभास्थानी वळला. तेथे नेत्यांच्या भाषणानंतर मनसे सैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि पाकिस्तानचा राष्ट्रध्वजाला आग लावून जाळत पायाखाली तुडविण्यात आला. मुंबादेवीला पोलिसी छावणीचे स्वरुप आज पहायला मिळाले. लोकमान्य टिळक पोलिस ठाण्याच्या फ़ौजफाट्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त शांतिलाल जाधव, वरिष्ठ निरीक्षक शरद नाईक, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश दळवी यांचेसह राज्य राखीव पोलिस दलाच्या 2 गाड्या, महिला पोलीस अधिकारी आणि साध्या कपडयातील पोलिस मोठ्या प्रमाणात हजर होते. मनसे महिला कार्यकर्त्यांची संख्या जरा जास्तच उठून दिसत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com