नवी मुंबईकरांना डासांचा त्रास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

बेलापूर - नवी मुंबईत काही दिवसांपासून डासांचे प्रमाण वाढले असून पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शुक्रवारी (ता. ९) स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. डासांवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन कुचकामी ठरत असल्याचा आरोप करीत पालिकेच्या आरोग्य विभागाचे त्यांनी वाभाडे काढले. त्यानंतर महिनाभर शहरात दररोज सायंकाळी धुरीकरण आणि औषधफवारणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बेलापूर - नवी मुंबईत काही दिवसांपासून डासांचे प्रमाण वाढले असून पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शुक्रवारी (ता. ९) स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. डासांवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन कुचकामी ठरत असल्याचा आरोप करीत पालिकेच्या आरोग्य विभागाचे त्यांनी वाभाडे काढले. त्यानंतर महिनाभर शहरात दररोज सायंकाळी धुरीकरण आणि औषधफवारणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तापमानात वाढ झाली असतानाही डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून फवारण्यात येणाऱ्या औषधांवर स्थायी समितीच्या सदस्यांनी शंका व्यक्त करत आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. यावर चर्चा करताना राष्ट्रवादीचे अशोक गुरखे यांनी डासांचे प्रमाण वाढल्याचे सांगत सायंकाळी फवारणीचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. परंतु नंतर ते बंद केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे डेंगी, मलेरियासारखे आजार होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रवादीचे देवीदास हांडे पाटील यांनी नवी मुंबई शहर खाडीकिनारी वसलेले असल्याने डासांचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे सांगत त्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाला नियंत्रण का मिळवता येत नाही, असा सवाल केला. डासांची पैदास वाढत असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त केली. पावसाळी गटारे कोरडी राहणे गरजेचे असूनही फेरीवाले या गटारांमध्ये पाणी सोडत असल्याने डासांची पैदास होत असल्याचा हांडे पाटील यांनी आरोप केला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता अशोक पाटील यांनी ऐरोली येथील होल्डिंग पॉण्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांचे प्रमाण वाढले असल्याची तक्रार करीत महिन्यातून एकदाही औषधफवारणी आणि धुरीकरण केले जात नसल्याचे सांगितले. ऐरोलीमधील नागरिक डास आणि दुर्गंधीने त्रस्त झाल्याचे सांगत यावर लवकर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. शिवसेनेच्या नगरसेविका ऋचा पाटील यांनी धुरीकरणानंतर डास कमी होत नसून लपून बसलेले डास उंच इमारतींमध्ये घुसत असल्याचे सांगितले. फवारणी आणि धुरीकरण करण्यात येणाऱ्या औषधांमध्ये काय वापरण्यात येते याबद्दल माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली. 

जुईनगर आणि सानपाडा येथील नाल्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले असून नाल्यांची सफाई कधी होणार? असा सवाल देखील नगरसेविका पाटील यांनी विचारला. शिवसेनेचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी औषधफवारणी जास्त प्रमाणात होणे गरजेचे असून पावसाळी नाल्यांमध्येही फवारणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. दयानंद कटके यांनी काही महिन्यांपूर्वी सायंकाळी डासांचे प्रमाण वाढल्याने फवारणी आणि धुरीकरण सुरू करण्यात आले होते; परंतु नंतर त्यांचे प्रमाण कमी झाल्याने फवारणी आणि धुरीकरण बंद केल्याचे सांगितले. परंतु आता पुन्हा महिनाभर फवारणी आणि धुरीकरण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

कंत्राटी सोनोग्राफीला मुदतवाढ 
वाशी येथील पालिकेच्या सार्वजनिक रुणालयात कंत्राटी पद्धतीने सोनोग्राफी मशीन पुरविण्याच्या प्रस्तावाला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रशासनाने प्रस्ताव मांडला होता. त्याला बैठकीत मंजुरी मिळाली. या मुदतवाढीसाठी ६३ लाख ३७ हजार खर्च केले जाणार आहेत. या कंत्राटाच्या प्रस्तावावर बोलताना रुग्णालयात डॉक्‍टर, नर्स कमी असल्याने रुग्णांचे हाल होत असून मनुष्यबळ वाढवण्याची मागणी सदस्यांनी केली. आरोग्य विभाग सक्षम नसल्याने सोनोग्राफीचे कंत्राट द्यावे लागते, ही शोकांतिका असल्याचे अशोक गावडे म्हणाले.

Web Title: marathi news mumbai news Mosquito belapur health