पत्नी कमावती असल्याने पोटगीची मागणी फेटाळली 

सुनीता महामुणकर
रविवार, 30 जुलै 2017

पतीने नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे आणि त्याचे उत्पन्न सुमारे 25 हजार आहे. शिवाय पत्नीच्या आजाराचा खर्चही त्यानेच केला आहे. मागील 25 वर्षांपासून ती स्वतः व्यवसाय करत असल्यामुळे तिला पोटगी मंजूर होऊ शकत नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला.

मुंबई : दुर्धर आजारातून बरी झालेल्या फॅशन डिझायनर पत्नीने केलेली पोटगीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. पत्नी कमावती असल्याने पोटगीची मागणी फेटाळत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. 

फॅशन डिझायनर असलेल्या आणि स्वतःचा व्यवसाय असलेल्या घटस्फोटीत पत्नीने पतीकडून निर्वाह भत्ता मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. 10 वर्षांपूर्वी ती दुर्धर आजाराने त्रस्त होती. पतीचे उत्पन्न सुमारे 50 हजार आहे. आजाराने पीडित असल्यामुळे पतीकडून पोटगी मिळावी, अशी मागणी तिने याचिकेत केली होती.

याचिकेवर न्या. आर. एम. सावंत आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. पतीच्या वतीने याचिकेतील मागणींचे खंडन करण्यात आले. पत्नीच्या आजारपणाचा सर्व खर्च पतीने स्वतःच्या वैद्यकीय विमा बचतीतून केला आहे. तसेच पत्नीच्या सध्याच्या वैद्यकीय चाचण्यांनुसार संबंधित आजारातून ती पूर्णपणे बरी झालेली आहे, असा युक्तिवाद पतीच्या वतीने करण्यात आला. 

पत्नीने जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले असून, तिचा स्वतःचा व्यवसाय आहे. ज्या ठिकाणी ती व्यवसाय करते, ती जागाही पतीनेच घेतलेली आहे, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले.

पतीने नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे आणि त्याचे उत्पन्न सुमारे 25 हजार आहे. शिवाय पत्नीच्या आजाराचा खर्चही त्यानेच केला आहे. मागील 25 वर्षांपासून ती स्वतः व्यवसाय करत असल्यामुळे तिला पोटगी मंजूर होऊ शकत नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला.

Web Title: marathi news mumbai news Mumbai High Court Family Court