नववर्ष शुभेच्छांचा सोशल मिडीयावर भडीमार

whatsapp
whatsapp

ठाणे : रविवार सुट्टीच्या दिवशी सरत्या वर्षाची अखेर असल्याने साऱ्यांनीच थर्टी फर्स्ट अर्थातच नववर्षाचे स्वागत जल्लोषात किंबहुना सामिष भोजनाचा आस्वाद घेत केले. तसेच, नवीन वर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना देताना भेटीगाठी टाळून सोशल मिडियावरच भडीमार केल्याचे दिसून आले.

पूर्वी नववर्षाच्या शुभेच्छांसाठी भेट कार्डे देण्याची प्रथा होती. मात्र, भेटकार्डे जाऊन आजकाल इंटरनेटच्या जमान्यात दुनिया मुठ्ठीत आल्याने शुभेच्छांची देवघेवही व्हॉटसअॅप, फेसबुकद्वारे ऑनलाईन होऊ लागली आहे. परंतु, नित्यनेमाने येणाऱ्या संदेशांच्या भाऊगर्दीत नववर्षाच्या शुभेच्छांचा हा भडीमारही साऱ्यांना नकोसा बनल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

आपण सगळेच उत्सवप्रेमी असल्याने कोणताही सण-उत्सव असला की शुभेच्छा दिल्या जातातच. पूर्वी भेटकार्डद्वारे शुभेच्छा दल्या जात. त्यामुळे शुभेच्छा देणारे भेटकार्डे घेण्यासाठी दुकानांत गर्दी करायचे, हल्लीही गर्दी असते, पण फार तुरळक प्रमाणात. कारण, साऱ्यांवर आता सोशल मिडियाचे गारुड आहे. सोशल मिडीयावरुन होत असलेला शुभेच्छांचा वर्षाव हे आता नित्याचाच रतीब बनला आहे.व्हॉटसॲपवर तर, रोजच शुभेच्छा आणि शोकसंदेश दिले जातात. यातील किती संदेश शुभेच्छा देणारे स्वत: तयार करतात हा संशोधनाचा विषय आहे. अनेक मेसेज एकतर फॉरवर्ड किंवा कॉपी पेस्ट केलेले असतात. एकाकडून आलेला संदेश अनेकजणांना फॉरवर्ड करणे हा प्रकार सोशल मिडीयावर प्रचलित असल्यामुळे एकच मेसेज मोबाईलवर अनेकवेळा येत असतो. त्यामुळे अनेकदा हे संदेश वाचले जात नाही. जरी सोशल मिडीयावर शुभेच्छा येत असल्या तरी हल्ली दिवाळी असूदे की, नववर्ष स्वागत तरुणाई एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मिडियाचाच सर्वाधिक वापर करताना दिसून येते. काहींनी पार्टीस्थळावरून फेसबुक लाइव्ह करून थेट शुभेच्छा दिल्या. 

दरम्यान,शुभेच्छा हे जरी निमित्त असले तरी एकमेकांना भेटणे हे जास्त महत्वाचे असते. व्हॉटसअॅप आणि सोशल मिडीयामुळे एकमेकांशी संवाद फार कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे एकीकडे एकमेकांच्या संपर्कासाठी जरी हे माध्यम महत्वाचे असले तरी, यामुळे दुरावा वाढत असल्याची खंत काही ज्येष्ठ नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे.

काही गमतीदार संदेश

  • टच धिस लाईन – या छोटेखानी लिंकमधून संगीतमय शुभेच्छांचा सुरेख सोशल अविष्कार दाखवला आहे.  
  • काही महाभागांनी शुभेच्छासह नववर्षाचे तारीखवार दिनदर्शिका पाठवून वर्षभरातील विधी-उपविधीची माहिती दिली. तसेच, काहींनी या वर्षातील सुट्यांच्या तारखा व सणांची यादी पाठवून एकदाच एडव्हान्स शुभेच्छा देण्याचा आगाऊपणा केला आहे.
  • काहींनी पुणेरी संवादाचे दाखले देत शुभेच्छा दिल्या.थर्टी फर्स्ट पार्टीसाठी कुणी फोन करू नये.यासाठी “मला एक लाखांची गरज आहे” असा संदेश सोशल मीडियात पाठवल्याने दुसऱ्या दिवशीपर्यंत कुणीही फोन केला नाही.यामुळे फोनच वाजला नसल्याने झोपही शांत लागल्याचे म्हटले.
  • आयुष्यात नवीन रुजवात करणाऱ्यांसाठी संधी – सोमवारीच नववर्ष प्रारंभ आहे.
  • काहींनी साहित्यिकांच्या ओळी आणि कविता टाकून शुभेच्छा दिल्या.
  • माझं नववर्ष गुढी पाडव्याला – असा उपहास व्यक्त करणाऱ्या मराठी बाण्याचे संदेशही स्वाभिमान जागवणारे होते.
  • मोदीच म्हणाले ‘प्या’रे देशवासियो...कॉर्टर काळजात घुसली...फिटे अंधाराचे जाळे या चालीवर पिती अंधारात सारे ...कुणी दारू देता का दारू असा नटसम्राट स्पेशल.... साऱ्यांना पुन्हा 18 व्या वर्षात पदार्पणाची संधी...अभिनेत्री नूतन, वर्षा उसगावकर आणि क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यांच्या आद्याक्षरांच्या नावांचा उपयोग करून तयार केलेला शुभेच्छा संदेश तर खूपच गाजला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com