2019 मध्ये मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे: राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

सर्व प्रश्न संपले आहेत. आनंदीआनंद आहे. त्यामुळे आमचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री गाणे गात आहेत. हातवारे करणारा हा सांबा कोण आहे, असे पाहिले तर ते मुनगंटीवार होते. मुनगंटीवार रजनीकांतचे बारावे डमी वाटतात. हे मुख्यमंत्री नाहीत तर वर्गातील मॉनिटर आहेत.

मुंबई : 2019 मध्ये भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदींनी काँग्रेसमुक्त भारत झाला पाहिजे असे म्हटले होते, पण आता मोदीमुक्त भारत झाला पाहिजे असे म्हणण्याची वेळ आली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाचे काय झाले. केंद्रातल आणि महाराष्ट्रातील भाजप सरकार राज्याचे हिताचे नाही, अशी खरमरीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी आज सभा झाली. यावेळी त्यांनी मोदींच्या धोरणावर आणि त्यांच्या घोषणांवर टीका केली. मोदींचा खरा चेहरा आता देशवासियांना कळला आहे, अशी टीका त्यांनी केली. 

राज ठाकरे म्हणाले, की गुजरातमध्ये माझ्यासमोर वेगळे चित्र निर्माण करण्यात आले, आता खरे चित्र समोर येत आहे. पंधरा लाख खात्यांवर टाकू असे खोटे तुम्ही सांगता आणि अमित शहा म्हणतात हा चुनावी जुमला होता. पंतप्रधान देशाशी खोटे बोलत आहेत.फक्त शो सुरु आहे. मोदी जगभर फिरून वडे, भजी बनविण्यासाठी पीठ बनविले जात आहेत. मोदी जगभर फिरले पण एक पैसा देशात आलेला नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ शकत नाही, उलट त्यांच्या जमिनी काढून घेण्यात येत आहेत. 

महाराष्ट्रात सध्या काही गंभीर प्रश्न आहेत, असे मला वाटत नाही. सर्व प्रश्न संपले आहेत. आनंदीआनंद आहे. त्यामुळे आमचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री गाणे गात आहेत. हातवारे करणारा हा सांबा कोण आहे, असे पाहिले तर ते मुनगंटीवार होते. मुनगंटीवार रजनीकांतचे बारावे डमी वाटतात. हे मुख्यमंत्री नाहीत तर वर्गातील मॉनिटर आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. 

मनसे संपला असे ज्यांना वाटतय आणि ज्यांनी लिहिलय त्या सर्वांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यावे. गेल्यावर्षी कौटुंबिक कारणामुळे गुढीपाडव्याची सभा घेता आली नाही. पण, या वर्षापासून दरवर्षी गुढीपाडव्याला मनसेची सभा होणार आहे, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे :

- आमचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री गाणे गात आहेत. हेच दुसऱ्या कोणी मुख्यमंत्र्यांनी केले असते, तर या पत्रकार मंडळींनी फाडून खाल्ले असते. पण, यांच्या बाबतीत सर्व चालते.

- नीरव मोदीचे प्रकरण विसरण्यासाठी श्रीदेवीच्या निधनाची बातमी सुरु केली. श्रीदेवीने कोणते राष्ट्रीय कार्य केले होते, की तिचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळले होते. शेवटी उघड काय झाले तर त्यांचा मृत्यू दारू पिऊन झाला. ही चूक महाराष्ट्र सरकारची आहे. पद्मश्री असलेल्यांना राष्ट्रध्वजात गुंडाळतात असे सांगणे चूक आहे.

- सध्या देशात बातम्या काय द्यायच्या हे सरकार ठरवत आहे. एका पत्रकाराने राजीनामा देताना सांगितले, की हा मीडिया सरकारला विकला गेला आहे. अमित शहा हे सर्व करत आहेत, ही आणीबाणी नाहीतर काय आहे.

- मोदी, शहा जोडगोळी मीडियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. 

- न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची बातमी कितीवेळा दाखविली. न्यूज चॅनेल व मीडियाचे स्वातंत्र्य यांनी हिरावून घेतले आहे. न्यायाधीश पण हेच सांगत होते. आमच्यावर दबाव येतोय, विरोधात असणाऱ्यांना संपवून टाकण्याचे काम सुरु आहे.

- अक्षय कुमारचे आता सर्व चित्रपट भारत या नावावर येत आहेत. तो अक्षय कुमार नसून, भारत कुमार आहे. पॅडमॅन, टॉयलेट हे चित्रपट सरकारने स्पॉन्सर केले आहेत. 

- नितीन गडकरींकडून नुसते लाखो कोटींचे फुगे उडविले जात आहेत. वाट्टेल ते आकडे सांगून देशाची फसवणूक करण्यात येत आहे

- विरोधासाठी विरोध करणारा मी नाही, चांगले होत असेल तर मी अभिनंदन करेल

.- शेतकरी मोर्चाला नक्षलवादी, कम्युनिस्ट असा रंग देण्यात येत आहे. आजच्या सभेला धर्मा पाटील यांचे चिरंजीव येणार होते, पण प्रकृती अस्वस्थामुळे येऊ शकले नाही. 

- ज्या ज्या घोषणा यांना आजपर्यंत केल्या आहेत, त्यातील एकही पूर्ण झाल्या नाहीत.

- समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्येही असेच प्रकार झाले आहेत.

- आताचा मुख्यमंत्री बसवलेला मुख्यमंत्री असून, स्वतःच्या आत्मविश्वासावर आलेला नाही.

- विद्यमान सरकारला महाराष्ट्र आणि मराठी माणसाशी काही देण-घेणं नाही. 

- मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानालाही पोखरल जात आहे. उत्तर प्रदेशातील बिल्डरांच्या मदतीने जमिनी बळकाविल्या जात आहेत.  

- महाराष्ट्रातील नागरिकांना रोजगार न मिळता बाहेरून येणाऱ्यांना घरे आणि नोकऱ्या मिळत आहेत. शहरातील मराठी माणूस बाहेर फेकला जातोय.
 

- रॅफेल कराराची आकडे फुगविण्यात आले, विमान बनविण्याचे काम अनिल अंबानी यांच्या कंपनीला देण्यात आले.

- संरक्षणमंत्री सीतारामन संसदेत सांगत आहेत, की कितीचा करार झाला आणि विमान बनविणारी कंपनी कोणती आहे. रॅफेल करारात कोणी किती पैसे खाल्ले हे सगळ्यांना माहिती आहे, पण कोणीच बोलायला तयार नाही.

Web Title: Marathi News Mumbai News Political News Raj Thackeray Criticizes Government