मेडिकल कीट घेऊन धावणारी ठरली शिर्डी मॅरेथॉनची उपविजेती

Mumbai News Pradnya Patil Panvel News Marathon Struggler
Mumbai News Pradnya Patil Panvel News Marathon Struggler

उल्हासनगऱ : 'ती' स्नायूंच्या विकाराची डॉक्टर. धावण्याचा कोणताही सराव किंबहुना अनुभव नाही. तिला माथेरान मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचे स्नायू जखडल्यास त्यावर उपचार करण्यासाठी बोलावण्यात येते. त्यानंतर याच ठिकाणी झालेल्या तिसऱ्या मॅरेथॉनमध्ये ती मेडिकल कीटसह 25 किलोमीटर धावते. तिला नुकत्याच शिर्डीत पार पडलेल्या मॅरेथॉनमध्येही उपचारांसाठी आमंत्रित केले जाते. येथे तिच्यात दडलेली स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिला प्रवृत्त करते. 'ती' चक्क शिर्डी इंटरनॅशनल मॅरेथॉनची उपविजेती ठरते.

उल्हासनगरात राहणाऱ्या डॉक्टर प्रज्ञा प्रमोद पाटील यांची ही कहाणी. स्नायू विकारांवर औषध न देता उपचार करण्याचा तिचा हातखंडा आहे. तिची आई इंदूमती यांनी दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करून तर वडील प्रमोद पाटील यांनी लॅबमध्ये फोटो धुऊन प्रज्ञासोबत हर्षदा यांना शिक्षित केले आहे.

मुळात रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये राहणारे प्रमोद पाटील यांनी नातवाईकांच्या सांगण्यावरून 25 वर्षांपूर्वी उपजीविकेसाठी उल्हासनगर गाठले. ते स्टेशनजवळील सीतारामनगरमध्ये भाड्याच्या घरात राहू लागले. पाटील यांनी फोटो धुण्याचे तर त्यांची पत्नी इंदूमती या धुणीभांडीचे काम करून मुलींच्या शिक्षणाकडे भर दिला.प्रज्ञाने 12 वी विज्ञान शाखेतून पुण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये पाच वर्षे स्नायू विकारांचे वैद्यकीय शिक्षण घेतले. 

प्रज्ञा ही घाटकोपरमधील एका मणक्याच्या स्नायूंच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर म्हणून काम करते. एखादी मॅरेथॉन स्पर्धा असली की या ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टरांना स्पर्धेला प्रथमोपचारासाठी बोलवण्यात येते.

मागच्या वर्षी माथेरानमधील रणबडी या टीमने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्यावर घाटकोपर क्लिनिकमधून डॉ. प्रज्ञा पाटील यांना माथेरानमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा झालेल्या दुसऱ्या स्पर्धेतही डॉ. प्रज्ञा यांनीच प्रथमोपचाराची जबाबदारी पार पाडली.

मात्र, तिसऱ्या स्पर्धेत मेडिकल कीटसह स्पर्धेत धावण्याचा मानस केला. या स्पर्धेमध्ये प्रज्ञाने तब्बल 25 किलोमीटर अंतर मेडिकल कीटसह पार केले. या प्रेरणेतून प्रज्ञाने 21 जानेवारी 2018 मधील मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन अडीच तासात 42 किलोमीटर अंतर पूर्ण केले. यात तिला अखेरपर्यंत धावत राहिल्याबद्दल मेडल, प्रमाणपत्र देण्यात आले. 

11 फेब्रुवारी 2018 रोजी शिर्डी येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत प्रथमोपचारासाठी माथेरान रणबडी टीमने डॉ. प्रज्ञाला बोलावले. तिने धावण्याची इच्छा आयोजकांकडे व्यक्त केली.10 फेब्रुवारीच्या रात्रीला तिच्या नावाची नोंदणी झाली आणि याच शिर्डी इंटरनॅशनल स्पर्धेत उल्हासनगरात राहणारी डॉ.प्रज्ञा पाटील ही रणरागिणी उपविजेती ठरली. तिला 9 हजार रुपयांचा धनादेश व भव्य ट्रॉफीने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रज्ञाचे शिवसेनाशाखा प्रमुख सुनील सानप यांनी अभिनंदन केले असून, कायद्याने वागा, जनक्रांती संघटना व्हॉटस्अप ग्रुपवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आहे.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आईने धुणीभांडी व वडिलांनी फोटो धुऊन आम्हा बहिणींना शिक्षित केले आहे. आता आई दुसऱ्यांच्या घरी खानावळ करते. अशा परिस्थितीमध्ये भाड्याचे घर त्यांनीच दोघांच्या कमाईतून विकत घेतले आहे. आता डॉक्टरी क्षेत्रात स्थिरावताना मॅरेथॉन स्पर्धेत सातत्याने भाग घेणार. आईवडिलांची सेवा करणार, असे डॉ.प्रज्ञा पाटीलने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com