मालमत्ता कर थकविल्याने बिल्डरांचे तीन भूखंड सील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

पालिकेने आर्थिक वर्षात मालमत्ता करातून पाच हजार 403 कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे ध्येय ठेवले होते; मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तीन हजार 820 कोटी जमा झाले आहे. अनेक वर्षांपासून मालमत्ता करापोटी नऊ हजार 947 कोटींची थकबाकी आहे. यापूर्वी पालिकेने मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या कार्यालयाला मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी सील केले होते. 

मुंबई : मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी मुंबई पालिकेने बिल्डरांना दणका दिला आहे. पालिकेने तीन बिल्डरांचे भूखंड सील केले आहेत. तर, नेपियन्सी रोड येथील रोहन बिल्डरची आशियाना ही पंचतारांकीत इमारतही सील केली आहे. पालिकेने 28 कोटींच्या थकबाकीप्रकरणी सात मालमत्ता सील केल्या आहेत. 

कुर्ला येथील एचडीआयएल कंपनीचे साईड ऑफिस सील केले आहे. गोरेगाव येथील रिलाएबल बिल्डर्स, गोरेगाव आरे रोड येथील सनशाईन हाऊसिंग ऍन्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर यांचे भूखंड सील केले आहे. त्याचबरोबर खार येथील ट्विलाईट सोसायटीचा मोकळा भूखंड, ग्रॅन्ट रोड येथील प्रसिद्ध नाझ सिनेमा आणि आशियाना इमारतीची लिफ्ट सील केली आहे. देवनार इंडस्ट्रीयल प्रिमायसेसवरही कारवाई केली आहे. त्यांच्या मालकीचा मोकळा भूखंड सील केला आहे. 

पालिकेने आर्थिक वर्षात मालमत्ता करातून पाच हजार 403 कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे ध्येय ठेवले होते; मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तीन हजार 820 कोटी जमा झाले आहे. अनेक वर्षांपासून मालमत्ता करापोटी नऊ हजार 947 कोटींची थकबाकी आहे. यापूर्वी पालिकेने मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या कार्यालयाला मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी सील केले होते. 

अशी आहे थकबाकी 

- आशियाना (रोहन बिल्डर) - सात कोटी 99 लाख 
- नाज सिनेमा - चार कोटी 13 लाख 
- रिलाएबल बिल्डर - चार कोटी 60 लाख 
- सनशाईन हाऊसिंग ऍन्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर - चार कोटी 8 लाख 15 हजार 
- एचडीआयएल - चार कोटी 41 लाख 
- देवनार इंडस्ट्रीयल प्रिमायसेस सहकारी संस्था - दोन कोटी 18 लाख 
- ट्‌विलाईट सोसायटी - 90 लाख 71 हजार 

Web Title: Marathi News Mumbai News Property Tax Pending Builder 3 Assets Seal