भाजपसारखी बनावट सदस्य नोंदणी करणार नाही : राज ठाकरे

विजय गायकवाड
शुक्रवार, 9 मार्च 2018

मनसैनिकांनी सदस्य नोंदणीची माहिती देणारे फलक लोकांना दिसतील अशा ठिकाणी लावावे, असे आदेश त्यांनी दिले. याप्रसंगी राज ठाकरेंच्या काही प्रमुख व्यंगचित्रांच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. मराठी महिला जगत, महाराष्ट्रातील कर्तबगार पुरुष, मराठी कुळ आणि मूळही तीन पुस्तके मनसैनिकांनी जरुर वाचावी, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितले.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १२ व्या पक्षस्थापना दिनी सदस्य नोंदणी मोहीमेचा शुभारंभ करताना भाजपची खिल्ली उडवली आहे. मनसेची सदस्य नोंदणी इतर राजकीय पक्षांसारखी बोगस असणार नाही. भाजपासारखी आकडे दाखवण्यासाठी नोंदणी करायची नाही. आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत का? अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १२ व्या वर्धापनादिनानिमित्त मुंबईतील रंगशारदा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान 'आम्ही आणि आमचे बाप' या नाटकाचा प्रयोग झाला होता. मध्यांतरामध्ये झालेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. वैयक्तिक कुटुंबाबरोबरच मनसैनिक हे माझे कुटुंब असल्याचे त्यांनी सांगितले. मला जे बोलायचे आहे ते मी १८ तारखेला शिवतीर्थावर बोलणार, असे त्यांनी जाहीर केले. 

१८ तारखेला मी बोलणार असल्याने तुम्ही घरी पूर्वकल्पना द्या. बाजारातून मेणबत्त्या आणून ठेवा. अनेक ठिकाणी माझ्या सभेवेळी वीज घालवली जाते. मनसैनिकांनी दिवे घालवणाऱ्या अधिकाऱ्यांशी आधी बोलून ठेवावे. यावेळी जर सभा सुरु असताना अशा काही गोष्टी केल्या तर त्यांना तुडवा. जर इतर पक्षांच्या दबावाला बळी पडून वीज घालवणार असतील. तर त्यांना हिसका दाखवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मनसेकडून ९२११७८७७७७ या मोबाईल क्रमांकावरून एसएमएसच्या माध्यमातून नोंदणी सुरु करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. 

मनसैनिकांनी सदस्य नोंदणीची माहिती देणारे फलक लोकांना दिसतील अशा ठिकाणी लावावे, असे आदेश त्यांनी दिले. याप्रसंगी राज ठाकरेंच्या काही प्रमुख व्यंगचित्रांच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. मराठी महिला जगत, महाराष्ट्रातील कर्तबगार पुरुष, मराठी कुळ आणि मूळही तीन पुस्तके मनसैनिकांनी जरुर वाचावी, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितले.

21 मार्चनंतर मनसे पदाधिकारी राज्यव्यापी दौरा करणार असून, त्यानंतर एप्रिलमध्ये राज ठाकरे स्वत: राज्यभर दौरा करणार असल्याचेही यावेळी पक्षाकडून सांगण्यात आले. 

Web Title: Marathi News Mumbai News Raj Thackeray Criticizes BJP Government