सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

Agitation
Agitation

मुंबई : सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली शासनाने सिद्धीविनायक मंदिर ताब्यात घेतले; मात्र तेथे चांगले व्यवस्थापन देण्याऐवजी शासननियुक्त विश्‍वस्त मंडळानेच भ्रष्ट कारभार करून लाखो रुपयांच्या देवनिधीची लयलुट केली आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार करणार्‍या राजकारण्यांनी देवालाही सोडलेले नाही. मंदिरात भ्रष्टाचार करून मंदिरांचे पावित्र्य भंग करणार्‍या भ्रष्ट विश्‍वस्तांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी संप्तत मागणी आज विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात केली. या वेळी शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले आणि आमदार राजन साळवी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाचा विषय जाणून घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

आझाद मैदानात आयोजित आंदोलनात योग वेदांत समिती, श्रीराम हिंदू सेना, जैन संघ पनवेल, बजरंग दल, श्री शिवकार्य प्रतिष्ठान-विक्रोळी, हिंदू राष्ट्र सेना, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, हिंदू गोवंश रक्षा समिती, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, हिंदू रक्षा सेना, श्री बजरंग सेवा दल, परशुराम सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी हातात फलक घेऊन मंदिर सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील शेकडो भाविकांनी या आंदोलनात सहभागी होऊन श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी केली. याविषयी समस्त भाविक आणि कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव एन्.के. जमादार यांना निवेदन देण्यात आले.

सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी भक्तीभावाने अर्पण केलेल्या धनामध्ये काही माजी विश्‍वस्तांनी जो अपहार केला आहे त्याचा मी जाहिर निषेध करतो. मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर शासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आमदार भरतशेठ  गोगावले यांनी केली.

श्री सिद्धीविनायक मंदिर हे महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या पलिकडील समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा भ्रष्टाचार निपटून काढतील, याची मला खात्री आहे. मंदिरातील धनाचा अपहार करून भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांना शासन निश्‍चितच शिक्षा करेल. मी एक हिंदू म्हणून विधानसभेत सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराचा विषय मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, असे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

श्री सिद्धीविनायक मंदिराच्या काही माजी विश्‍वस्तांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचे श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने नुकतेच उघड केले आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे माजी न्यायमूर्ती टिपणीस समितीने दिलेल्या अहवालामध्ये श्री सिद्धीविनायक मंदिराच्या माजी विश्‍वस्तांचा घोटाळा उघड झाला आहे; तरी अद्याप त्याविषयी शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळेच वारंवार भ्रष्टाचाराच्या घटना मंदिरांमध्ये उघडकीस येत आहेत. हिंदूंच्या श्रद्धेशी संलग्न असलेल्या विषयीचे शासनाचे हे उदासिन धोरण म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेला तडा देणारे आहे. देवनिधीचा अपहार करणे म्हणजे महापाप आहे. 

मागील १० दिवस श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचारविरोधी कृती समिती आणि भाविक यांनी मुंबईमध्ये अंधेरी, दादर, घाटकोपर, भांडुप येथे, ठाणे जिल्ह्यात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, ठाणे शहर या ठिकाणी, रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल आणि तळोजा, पालघर जिल्ह्यात नालासोपारा, तर नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे आदी १२ ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबवून माजी विश्‍वस्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी जनजागृती केली. या स्वाक्षरी अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेत हजारो नागरिकांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला. 

भ्रष्टाचार असा झाला -

शासनाच्या परवानगीशिवाय मंदिराच्या निधीतून कोणत्याही स्वरूपाचे दौरे आयोजित करण्यात येऊ नयेत, अपवादात्मक परिस्थितीत दौर्‍याची आवश्यकता भासल्यास विभागाकडून पूर्वमान्यता घेण्यात यावी, वाहन वापर आणि वाहनचालक यांच्या अतिकालीन भत्त्यांवर नियंत्रण ठेवण्यात यावे’, अशा सूचना असतांना देखील त्यांचे पालन न करता दिनांक १ जानेवारी २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत या न्यासाच्या विश्‍वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या देणग्यांसंदर्भातील अभ्यास दौर्‍याच्या नावाखाली ८ लाख ११ सहस्र २५९ रुपये आणि वाहकाला अधिकचा भत्ता म्हणून ४ लाख ८० सहस्र ४० रुपये असा एकूण १२ लाख ९१ सहस्र २९१ रुपये इतका खर्च केला आहे. यामध्ये लॉजिंग, खानपान इत्यादी खर्चाचाही समावेश आहे. अशा प्रकारे मंदिराच्या पैशामध्ये विश्‍वस्तांनी मोठ्या प्रमाणात अपहार केला आहे.

मंदिराच्या नियमांमध्ये दौर्‍याला अनुमती नसतांना अभ्यास दौर्‍याच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा करणे, खोटी देयके जोडणे, टिपणीस समितीच्या अहवालानुसार गोविंदराव आदिक हे राज्याचे विधी आणि न्याय मंत्री, तर दिलीपराव सोपल हे राज्यमंत्री असतांना या दोघांच्या न्यासाला अनुक्रमे ५० लाख आणि २० लाख रुपये देणगी देण्यात आली. या प्रकरणी श्री सिद्धीविनायक मंदिराच्या विश्‍वस्तांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी खटले प्रविष्ठ करावेत आणि त्यांच्याकडून अपहार केलेले मंदिराचे धन व्याजासहित वसूल करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.                 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com