विद्यार्थ्यांसाठी हजेरी 50 टक्‍के सक्‍तीची ; विद्यापीठाचा नियम कायम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी 50 टक्के असण्याची सक्ती मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी 50 टक्के असण्याची सक्ती मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांकडून 75 टक्के हजेरी वर्गामध्ये लागणे बंधनकारक आहे; मात्र महाविद्यालयांच्या प्राचार्यांना 25 टक्के हजेरीमध्ये मुभा देण्याचे विशेष अधिकार आहेत.

त्यामुळे 50 टक्के हजेरीचा निर्णय हा विद्यापीठाकडूनच मान्यता देणारा आहे; मात्र 50 टक्केचा निर्णयही विद्यार्थ्यांसाठी कठोर आहे, असा दावा करणारी याचिका कांदिवलीमधील महाविद्यालयाने केली होती. या निर्णयामुळे सुमारे 35 मुलांवर कारवाई केली आहे. 

याविरोधात विद्यार्थ्यांनी केलेले अपीलही विद्यापीठाच्या संबंधित समितीने अमान्य केले आहे. त्यामुळे महाविद्यालयाने न्यायालयात याचिका केली होती; मात्र न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने विद्यापीठाचा नियम ग्राह्य धरला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा हा निर्णय असून, याबाबत विद्यापीठाची सर्वोच्च समितीही बदल करू शकत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी आहे, त्यांनी जर पुरेसे सबळ कारण दिले तर त्याचा विचार नेहमीच विद्यापीठाकडून केला जातो, असे विद्यापीठाच्या वतीने ऍड. रुई रॉड्रिग्ज यांनी सांगितले;

मात्र हजेरीचा नियम हा केवळ विद्यापीठासाठीच नाही तर विद्यार्थी व महाविद्यालयांसाठीही महत्त्वाचा आहे. कारण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी आणि संरक्षणच या माध्यमातून घेतले जात आहे. त्यामुळे या नियमांमध्ये शिथिलता आणता कामा नये, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले.  

 
 

Web Title: Marathi News Mumbai News Students 50 percent attendance mandatory says High Court