सुरेश पुजारी टोळीचे पाच गुंड गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

मुंबई : व्यावसायिकाला 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या सुरेश पुजारी टोळीच्या पाच गुंडांना शनिवारी (ता. 20) मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गजाआड केले. हरीश कृष्णपा कोटियन, संकेत उदय दळवी ऊर्फ सॅंडी, अनिकेत किशोर ठाकूर, नुरमोहम्मद दिलमोहम्मद खान ऊर्फ कल्लू, प्रथमेश शिवराम कदम अशी त्यांची नावे आहेत.

पाचही जणांना 25 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

तक्रारदार हे उल्हासनगर येथील रहिवासी असून, त्यांचा फोर्ट परिसरात कॅमेराविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना काही दिवसांपासून सुरेश पुजारीकडून खंडणीसाठी धमकीचे फोन येत होते. 50 लाख रुपये न दिल्यास परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली होती. व्यावसायिकाने याची तक्रार खंडणीविरोधी पथकात केली होती.

खंडणीविरोधी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान हरीश कोटियनला संशयित म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या कटात सहभाग असल्याचे उघड झाले. व्यावसायिकाच्या हालचालींवर रेकी करण्यास सांगितले होते. त्याच्याकडे पोलिसांना एक मोबाईल सापडला. कोटियन हा पुजारीच्या सतत संपर्कात होता. उरलेल्या चार साथीदारांना पोलिसांनी विविध परिसरातून गजाआड केले. त्या पाचही जणांनी दहशत निर्माण करण्याकरिता व्यावसायिकावर गोळीबार करण्याचे ठरवले होते.

आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुल, तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. पाचही आरोपी हे कल्याण, डोंबिवली आणि रत्नागिरीतील रहिवासी आहेत. गेल्या वर्षी या टोळीने आर. एन. पार्क या हॉटेलमध्ये खंडणीच्या वादातून गोळीबार केला होता. गोळीबारात एक महिला जखमी झाली होती.

आरोपीच्या चौकशीत काही धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सुरेश पुजारीने मुंबई आणि ठाणे परिसरातील 25 व्यावसायिकांना खंडणीसाठी फोन केले होते. काहींनी खंडणीची रक्कम पुजारीला दिली होती. दोन व्यावसायिकांवर गोळीबार करण्याची जबाबदारी अटक आरोपींवर दिली होती. आरोपीच्या अटकेमुळे गोळीबाराचा प्रयत्न फसल्याचे पोलिस तपासात उघड झाले. 

Web Title: marathi news Mumbai News Suresh Pujari Gang