वाहतूक कोंडीमुळे उरणमधील परीक्षार्थींचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

गणिताच्या पेपरसाठी तु. ह. वाजेकर विद्यालयातील केंद्रावर येण्यास 50 परीक्षार्थींना आज उशीर झाला. पेपर 11 वाजता सुरू होतो. त्यामुळे बोर्डाच्या नियमानुसार त्यांना परीक्षेला बसता आले. 
- एस. टी. मोहिते, मुख्याध्यापक, तु. ह. वाजेकर विद्यालय 

उरण : जेएनपीटी आणि अन्य तीन बंदरांतील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या कोंडीचा फटका आज फुंडे येथील तु. ह. वाजेकर विद्यालय केंद्रातील दहावीच्या सुमारे 50 परीक्षार्थींना बसला. केंद्रावर सकाळी 10.30 पर्यंत पोहचण्याऐवजी हे परीक्षार्थीं 20 मिनिटे उशिराने पोहचले. बोर्डाच्या नियमानुसार त्यांना परीक्षेला बसता आले असले तरी तालुक्‍यातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

जेएनपीटी आणि अन्य तीन बंदरांतील अजवड वाहतुकीमुळे उरण तालुक्‍यात सर्वच मार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडी होते. या प्रश्‍नाकडे तालुक्‍यातील नागरिकांनी जेएनपीटीसह वाहतूक पोलिस आणि अन्य यंत्रणांचे वारंवार लक्ष वेधले आहे; परंतु ही समस्या अजूनही सुटली नाही. तालुक्‍यातील दहावीचे परीक्षार्थीं तर वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आले आहेत. जासई परिसरातून तु. ह. वाजेकर विद्यालयातील केंद्रावर येणाऱ्या परीक्षार्थींना जासई, सोनारी या परिसरात आज झालेल्या वाहतूक कोंडीमुळे गणिताच्या पेपरसाठी पोहचण्यास 20 मिनिटांचा विलंब झाला. 

याबाबत परीक्षार्थींनी "सकाळ'ला सांगितले की, परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 पर्यंत पोहचणे आवश्‍यक आहे. वाहतूक कोंडीमुळे आजची परीक्षा बुडण्याची भीती होती. त्यामुळे मोबाईलवरून कुटुंबीयांना कळवले. त्यांनी वेळीच धावपळ करून दुचाकीवरून केंद्रावर पोहचवल्याने दिलासा मिळाला. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे उरण तालुक्‍यात वारंवार वाहतूक कोंडी होते. आज विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाला असली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न कामगार नेते भूषण पाटील यांची "सकाळ'शी बोलताना उपस्थित केला. 

Web Title: Marathi News Mumbai News Uran News Student late for Exam due to Traffic Jam