गोरगरीब जनतेची भुक भागवणारी "शिवभोजन थाळी" झाली एक वर्षाची

सिद्धेश्वर डुकरे
Thursday, 28 January 2021

 • 3 कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा अस्वाद
 • योजनेवर आतापर्यत 86 कोटी रुपयांचा खर्च

मुंबई : ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख "अन्नपुर्णेची थाळी" म्‍हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पुर्ण झाले. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यत 3 कोटी 5 लाख 39 हजार 644  नागरिकांनी शिवभोजन थाळीचा अस्वाद घेतला आहे.
 
गरीबांची भुक भागवणारी योजना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हे सरकार संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत दिलेल्या शिकवणुकीनुसार काम करत आहे. या दशसुत्रीत "भुकेलेल्यांना अन्न" हे एक सुत्र आहे ते डोळ्यासमोर ठेऊन शिवभोजन योजनेची आखणी करण्यात आली असून शिवभोजन थाळीने लाखोच नाही तर कोट्यावधी लोकांची भुक भागवण्याचे काम केले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्त्वाची बातमी : तब्बल सहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सयामी जुळ्या मुली अलग; दोघींची प्रकृती स्थिर

योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने व योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी  मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे सचिव, अधिकारी- कर्मचारी, शिवभोजन योजनेचे केंद्र चालक यांचे अभिनंदन केले आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात 905 शिवभोजन केंद्रे 

राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दराने जेवण उपलब्ध करून देण्यासाठी गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.  एक वर्षभरात शिवभोजन योजनेअंतर्गत 905 केंद्र सुरु झाले असून योजनेवर आतापर्यंत 86.10 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

थाळी झाली आणखी स्वस्त...

सुरुवातीला लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत 10 रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले जात होते. परंतू कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  29 मार्च 2020 पासून ही थाळी फक्त 5 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. प्रत्येक थाळीमागे शहरी भागात 45 तर ग्रामीण भागात 30 रुपयांचे अनुदान शासनामार्फत केंद्रांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेसाठी "शिवभोजन" ॲप तयार करण्यात आले असून त्याचा वापर करूनच शिवभोजन थाळी वितरित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेचा तालुकास्तरापर्यंत विस्तार झाला आहे.

महत्त्वाची बातमी : अतुल भातखळकर Vs आदित्य ठाकरे : उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरून भाजपचा ठाकरेंवर निशाण 

टाळेबंदीच्या काळातमजूर, स्थलांतरीत लोक, राज्यातच पण बाहेर गावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने फक्त 5 रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देऊन त्यांची भुक भागवण्याचे काम केले. चपाती, भाजी, वरण भाताचं जेवण असणारी ही थाळी आज अनेक गरजू लोकांसाठी वरदान ठरत आहे. 

वितरित थाळींची महिनानिहाय संख्या

 • जानेवारी- 79,918
 • फेब्रुवारी- 4,67,869
 • मार्च- 5,78,031
 • एप्रिल- 24,99,257
 • मे- 33,84,040
 • जून- 30,96,232
 • जुलै- 30,03,474
 • ऑगस्ट- 30,60,319
 • सप्टेंबर- 30,59,176
 • ऑक्टोबर- 31,45,063
 • नोव्हेंबर- 28,96,130
 • डिसेंबर- 28,65,943
 • जानेवारी 2021 (25 जानेवारी पर्यंत) 24,04,192
 • एकूण 3,05,39,644

marathi news from mumbai shivbhojan thali turns one 86 crore spent in one year


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news from mumbai shivbhojan thali turns one 86 crore spent in one year