जव्हारमध्ये भूकंपाची दहशत कायम 

jawhar
jawhar

मोखाडा : चार वर्षांपूर्वी जव्हार तालुक्यात भूकंपाचे हादरे बसले होते. त्यानंतर मागील महिन्यापासून भूकंपाचे वारंवार धक्के बसत असून, त्याची तीव्रता अधिकच वाढली आहे. जव्हार तालुक्यातील वाळवंडा, कशिवली, डेंगाचीमेट यासह विक्रमगड तालुक्यातील काही भागात सोमवारी रात्री भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची 3 : 2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता होती. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे 214 घरांना भूकंपाच्या धक्क्याने भेगा पडल्या आहेत. तर या दहशतीमुळे येथील आदिवासी भेदरले असून घराबाहेर तंबूत, माळरानावर शेतात ऐन थंडीत वास्तव्य करीत आहेत. 
नोव्हेंबर महिन्यात जव्हारला भूकंपाच्या धक्क्याने हादरवले होते. त्यानंतर पुन्हा 25 आणि 29 नोव्हेंबरला भूकंपाचे धक्के जव्हारला बसले होते. या धक्क्यांनी जव्हार शहरासह लगतच्या वाळवंडा, कशिवली, डेंगाचीमेट, धानोशी, आणि कासटवाडी या गाव पाड्यांना हादरवले आहे. या धक्क्यांनी वाळवंडा भागातील सुमारे 38 घरांच्या भिंतींना तडे आणि भेगा पडल्या आहेत. त्याचे सरकारी पंचनामे त्यावेळी झाले. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून येथील आदिवासींना घराबाहेर झोपण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान,या धक्क्यातून सावरत असतानाच, पुन्हा सोमवारी रात्री सुमारे 8 ते 9 वेळा भूकंपाच्या धक्क्याने याच परिसराला हादरवले आहे. त्यामुळे येथील आदिवासी अधिकच भयभीत झाले आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीवरून या धक्क्याची तीव्रता 3 : 2 रिश्टर स्केल इतकी होती. या धक्क्याने चौक, वाळवंडा, कशिवली, पाथर्डी, डेंगाचीमेट आणि विक्रमगड तालुक्यातील काही परिसर बाधीत झाला आहे. चौक-80, वाळवंडा-84, कशिवली-8 आणि पाथर्डी- 4 येथील एकूण 176 तर नोव्हेंबर मध्ये बसलेल्या पहील्या धक्क्यात 38 अशा एकूण 214 घरांच्या भिंतींना तडे आणि भेगा पडल्या आहेत. या धक्क्यांनी नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे जव्हार तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहेत. 
तथापि, या बाधित घरांना गेलेल्या भेगांबरोबरच, घराचा महत्त्वाचा आधार असलेले पिलरही झुकले गेल्याने घरे कोसळण्याची भिती आदिवासींमध्ये निर्माण झाली आहे. त्याचबरोबर काही झोपड्यांचीही पडझड झाली आहे. वारंवार बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्याने आणि घरांना गेलेल्या भेगांमुळे आदिवासी भेदरले असून, त्यांनी घराबाहेर तंबूत व माळरानावरच्या शेताचा आसरा घेतला आहे. जव्हार तहसील कार्यालयाने नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून, त्या कुटुंबांना भरपाई मिळावी म्हणून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्याची माहिती तहसील कार्यालयांतील सूत्रांनी दिली आहे. तर या आठवड्याच्या अखेरीस दिल्लीहून आपत्ती व्यवस्थापन टीम पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे. जव्हार मध्ये भूकंपाच्या घटना वारंवार घडत असल्याने, येथे भूकंप मापक यंत्रणा बसवण्याची व त्यावर उपाययोजना करण्याची मागणी भेदरलेल्या आदिवासींनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com