कल्याण: वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे रिक्षा चालकांची धावपळ

रविंद्र खरात
बुधवार, 12 जुलै 2017

रिक्षामध्ये रिक्षाबद्दलची सविस्तर माहिती लावण्यासाठीची देण्यात आलेली पंधरा दिवसांची मुदत संपून गेली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कल्याण डोंबिवलीमध्ये रिक्षाचालकांवर धडक कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे.

कल्याण - रिक्षामध्ये रिक्षाबद्दलची सविस्तर माहिती लावण्यासाठीची देण्यात आलेली पंधरा दिवसांची मुदत संपून गेली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कल्याण डोंबिवलीमध्ये रिक्षाचालकांवर धडक कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर रिक्षाचालकांचे धाबे दणाणले असून वाहतूक पोलिस कार्यालयाबाहेर विहित नमुन्यात माहिती लावण्यासाठीचे फॉर्म भरून घेण्यासाठी रिक्षाचालकांनी गर्दी केली आहे.

वाहतूक पोलिसांनी कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू केलेल्या धडक कारवाईचे प्रवासी संघटनांनी स्वागत केले आहे. कल्याण आरटीओ अंतर्गत येणाऱ्या कल्याणमध्ये 7 हजार 741 , डोंबिवलीमध्ये 6 हजार 902 असे एकूण 14 हजार 643 रिक्षा अधिकृत असल्या तरीही यापेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. ठाण्यापाठोपाठ कल्याण पूर्व, पश्‍चिममध्ये महिला प्रवाशांसोबत हुज्जत घालणे, महिला प्रवाशांचा विनयभंग करण्याचा प्रकार घडल्याने वाहतूक पोलिसांच्या कारभारावर टिका झाली होती. या प्रकारावर आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिक्षा आणि टॅक्‍सीमध्ये रिक्षा मालक आणि रिक्षाचालकाची माहिती लावणे बंधनकारक केले. मात्र ही माहिती लावण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत संपली तरीही रिक्षा चालकांची दादागिरी संपली नाही. त्यामुळे कल्याण वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांच्या आदेशनुसार वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने सोमवारपासून धडक कारवाई सुरु केली होती.

रिक्षात माहिती न लावल्याने शंभरहून अधिक रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई थांबविण्यासाठी रिक्षा संघटना नेते आणि राजकीय पक्षानेही दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या दबावाला बळी न पडता वाहतूक पोलिसांनी सलग तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरु ठेवली. त्यामुळे रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी रिक्षा चालकांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाबाहेर विहित माहिती लावण्यासाठीचा नमुना प्रमाणित करून घेण्यासाठी रांग लावली आहे. तब्बल 3 दिवसात 1 हजार पेक्षा रिक्षा चालकांनी आपला फार्म भरून देत ते फलक लावली आहेत , या कारवाईचे स्वागत प्रवासी संघटनाने केले असून यात सातत्य ठेवण्याची मागणी प्रवासी संघटना उपाध्यक्ष राजेंद्र फड़के यांनी केली आहे .

रिक्षा चालकांची धावपळ
ही कारवाई थांबविण्यासाठी काही रिक्षा चालकांनी रिक्षा संघटना आणि राजकीय नेत्यांमार्फत वाहतूक पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केले. मागीलवर्षी स्मार्ट कार्ड लावलेले असतानाही नवीन कार्ड का लावावे असा सवाल करत कारवाई थांबविण्याचा प्रयत्नही झाला. मात्र वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरु राहिल्याने रिक्षा चालकांची धावपळ सुरु झाली .

प्रत्येक रिक्षा आणि टैक्‍सी चालकाने आपली माहिती आपल्या वाहनात लावणे बंधनकारक आहे. जुने स्मार्ट कार्ड लावले तरी चालेल. मात्र त्यातील माहिती अपडेट हवी. नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरु राहणार आहे.
- संभाजी जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण वाहतूक शाखेचे

महिला आणि सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाहतूक पोलिसांनी सुरु केलेली कारवाई कौतुकास पात्र आहे. राजकीय आणि रिक्षा संघटनाच्या दबावाला बळी न पडता कारवाईमध्ये सातत्य ठेवावे.
- राजेंद्र फडके, प्रवासी संघटना उपाध्यक्ष

Web Title: marathi news sakal news kalyan news autorikshaw news