ठाण्यात शिवसेनेचे बेकीचे राजकारण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

ठाणे - आदेशावर चालणारा पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेचा ठाणे महापालिकेतील कारभार म्हणजे एकीच्या ऐवजी बेकीच्या दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख प्रत्येक शहरात फुटबॉलचे मैदान होण्यासाठी प्रयत्नशील असताना ठाण्याच्या महापौरांनी मात्र फुटबॉलच्या मैदानासाठी सादर करण्यात आलेला प्रस्तावच बाजूला ठेवला आहे; तर शिवसेनेच्या वचनपूर्तीमधील महत्त्वाचा टप्पा असलेल्या टाऊन सेंटरच्या प्रस्तावाला शिवसेनेच्याच दोन नगरसेवकांनी भर सभागृहात विरोध केल्याने खळबळ उडाली आहे.

आदित्य ठाकरे यांचे फुटबॉलप्रेम सर्वांना परिचयाचे आहे. मुंबईत त्यांच्याकडून सातत्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणून त्यांचे मार्गदर्शन स्थानिक खेळाडूंना मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असतात. तसेच फुटबॉलसंबंधित स्पर्धा घेण्यासाठीही त्यांचा पुढाकार असतो. ठाण्यात एका उद्‌घाटन कार्यक्रमाला आल्यानंतर या शहरात एक फुटबॉलचे मैदान असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. आपल्या युवानेत्याची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिकेला मिळालेल्या जागेवर खासगी लोकसहभागातून फुटबॉल मैदान उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आला; मात्र हा प्रस्ताव संपूर्ण माहिती देणारा नसल्याचे सांगून महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या विषयाचा पुकारा होताच तो विषय तहकूब करण्यास सांगितले. या वेळी परिषा सरनाईक आदींनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला; पण पीठासीन अधिकारी महापौरांनीच हा प्रस्ताव थेट तहकूब केल्याने कोणालाही या विषयावर चर्चा करण्याची संधी राहिली नाही.

दरम्यान, यंदाच्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या देवराम भोईर, संजय भोईर यांनी काही आक्षेप घेऊन थेट टाऊन सेंटरलाच विरोध केला. हा प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांना, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना होते. त्यानुसार भोईर पिता-पुत्रांनी वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही हा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर करून घेतला. 

बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर
साकेत येथील रुस्तमजी बिल्डरच्या टाऊनशिप इमारतींमध्ये ग्लोबल इम्पॅक्‍ट हब स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी सादर केला होता. यापूर्वी या सेंटरची गरज माहिती असल्याने आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून असे सेंटर मुंबईत उभारण्यात आलेले आहे. त्यामुळेच असे टाऊन सेंटर उभारण्याचे शिवसेनेने त्यांच्या वचननाम्यात सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेसाठी हा प्रस्ताव प्रतिष्ठेचा आहे. अशा वेळी विरोधी बाकावरील नगरसेवकांकडून काही मुद्द्यावरून या प्रस्तावाला विरोध होणे अपेक्षित असताना थेट शिवसेनेच्याच नगरसेवकांनी त्याला विरोध केल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पंचाईत झाली होती; पण बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Web Title: marathi news shivsena thane politics