"सकाळ'च्या मैफलीत अवयवदानाची सुरावट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

सोना मोहपात्राची म्युझिकल ट्रिट
मैफलीत खऱ्या अर्थाने रंग भरले ते समाजभान जपणारी गायिका अशी ओळख असलेल्या सोना मोहपात्रा आणि तिच्या बॅण्डने. लोकप्रिय लोकसंगीतांच्या बरोबरीने तिने स्वतःची काही गाजलेली गाणी गाऊन प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. तिने गायलेल्या "ओ री चिरय्या', "आजा वे', "आफरीन', "रश्‍के कमर', "मैने तो पिया संग नैना लडाई रे', "रंगबोती' आदी गाण्यांनी मैफलीत अवयवदानाचे सूर गुंजले ते शेवटपर्यंत. सोनाने मराठमोळ्या रसिकांसाठी चार मराठी गाणी गाऊन स्पेशल गिफ्ट दिले.

नवी मुंबई - गेल्या वर्षी संत कबिराच्या सार्वकालिक दोह्यांचा आनंद देत उपस्थित रसिकांच्या मनामनात प्लास्टिकमुक्तीचे सूर जागवत आपले सामाजिक भान जपणाऱ्या "सकाळ' वृत्तपत्रसमूहाचा 47 वा वर्धापनदिनही रविवारी (ता. 28) मोठ्या झोकात पार पडला. यंदाच्या मैफलीत अवयवदानाचा सुरेल जागर करण्यात आला.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये राजकीय नेत्यांसह मान्यवरांची साथ, प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्राचा लाईव्ह बॅण्ड, हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींचे ग्लॅमर आणि उपस्थित रसिकांच्या जल्लोषात अविस्मरणीय कार्यक्रम झाला. प्लास्टिकमुक्तीच्या यशस्वी लढ्यानंतर "सकाळ'ने अवयवदानाबाबत राबवलेली व्यापक चळवळ प्रत्येकासाठीच प्रेरणादायी ठरली. मान्यवरांसह वाचक आणि उपस्थितांनी "सकाळ'च्या साक्षीने अवयवदानाचा संकल्प करून नव्या अनुभूतीचे सूर छेडले.

पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार आदी मान्यवरांबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीचा देखणा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री राकुल प्रीत सिंग, अभिनेत्री प्रिया बापट, अक्षता धबडगावकर, अभिनेते विजय कदम, मंगेश देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.

"सकाळ'वर प्रेम करणाऱ्या वाचकांची खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये सायंकाळी साडेपाचपासूनच गर्दी होऊ लागली होती. प्रवेशद्वारावरच अवयवदानाबाबत जागृती करणारे माहिती केंद्र सुरू होते. तिथे अवयवदानासंदर्भातील अर्जही भरून घेतले जात होते. कार्यक्रमाचा आस्वाद घेत अनेक रसिकांनी आवर्जून तिथे भेट देत आपला अवयवदानाचा निर्धार पक्का केला आणि त्याबाबतचे अर्जही भरून दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवेदिका शिल्पा गुजर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. "सकाळ' सामाजिक बांधिलकीतून राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. त्याबाबतचा एक व्हिडीओ सादर करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असलेल्या अवयवदानाची माहिती देण्यासाठी व्यासपीठावर अपोलो रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. डायराईझ मिर्झा यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांनी "सकाळ'च्या चळवळीचे कौतुक करून अवयवदानाबाबत साध्या-सोप्या शब्दांत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर टाळ्यांच्या गजरातच "सकाळ'चे संचालक भाऊसाहेब पाटील, "सकाळ' (मुंबई) चे संपादक राहुल गडपाले, वितरण सरव्यवस्थापक दिनेश शेट्टी आदी मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राहुल गडपाले यांनी "सकाळ'च्या सामाजिक बांधिलकीची भूमिका स्पष्ट केली. "सकाळ' राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. प्लास्टिकमुक्तीपासून अवयवदान चळवळीपर्यंतचा "सकाळ'चा यशस्वी प्रयोग त्यांनी उलगडून दाखवला. 

सोना मोहपात्राची म्युझिकल ट्रिट
मैफलीत खऱ्या अर्थाने रंग भरले ते समाजभान जपणारी गायिका अशी ओळख असलेल्या सोना मोहपात्रा आणि तिच्या बॅण्डने. लोकप्रिय लोकसंगीतांच्या बरोबरीने तिने स्वतःची काही गाजलेली गाणी गाऊन प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. तिने गायलेल्या "ओ री चिरय्या', "आजा वे', "आफरीन', "रश्‍के कमर', "मैने तो पिया संग नैना लडाई रे', "रंगबोती' आदी गाण्यांनी मैफलीत अवयवदानाचे सूर गुंजले ते शेवटपर्यंत. सोनाने मराठमोळ्या रसिकांसाठी चार मराठी गाणी गाऊन स्पेशल गिफ्ट दिले. "नारायणा रमा रमणा'पासून सुरू झालेली तिच्या संगीत मैफलीत "गगन सदन तेजोमय' आणि "ज्ञानोबा माऊली'ने गहिरे रंग भरले. नाट्यसंगीत, प्रार्थना आणि अभंगाचा सुरेख मिलाफ सादर करत तिने रसिकांना चांगलेच रिझवले. कळस गाठला तो तिने गायलेल्या "ढगाला लागली कळ' गाण्याने. अवघे ऍम्फी थिएटर तिच्या तालावर डोलत होते. आपल्या नॉनस्टॉप सव्वादोन तासाच्या परफॉर्मन्समध्ये तिने तब्बल 25 गाणी सादर करून रसिकांचे कान अन्‌ मन तृप्त केले. कार्यक्रमात सुरू असलेल्या अवयवदानाच्या जागराचे दान सोना मोहपात्राच्या काळजाला थेट भिडणाऱ्या गाण्यांच्या साथीने अवयवदात्यांच्या रूपात सत्पात्री पडले.

अवयवदानाची मोहीम तळागाळात पोहचावी 
"सकाळ'च्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी "सकाळ'ला मनापासून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, की केवळ वर्धापन दिन साजरा करण्याचा उद्देश न ठेवता "सकाळ'ने अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सुरू केलेला "मिशन ऑर्गन डोनेशन' उपक्रम कौतुकास्पद आहे. "सकाळ'च्या माध्यमातून सुरू झालेली जनजागृती तळागाळापर्यंत पोहचावी. अवयवदानाबाबत समाजात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्या दूर व्हाव्यात म्हणून "सकाळ'ने पुढाकार घेतल्याने मी त्यांना धन्यवाद देतो. अशा उपक्रमांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊ शकते, असेही ते म्हणाले.

Web Title: marathi news Sona Mohapatra Indian singer mumbai sakal 47th anniversary music