ठाण्यातील मुरबाडमध्ये आजी-आजोबा शाळा

thane
thane

मुरबाड (ठाणे) : आज्जीबाईंच्या शाळेमुळे जगभरात प्रसिद्ध झालेल्या मुरबाड तालुक्यातील फांगणे गावापाठोपाठ रविवार पासून शेलारी गावी आजी आजोबा शाळा सुरु झाली आहे. वयोवृद्धांसाठी काम करणाऱ्या कै. मोतीराम दलाल ट्रस्ट तर्फे ही शाळा सुरु झाली या अनोख्या शाळेत पाठ्य पुस्तकाऐवजी जीवनाचे शिक्षण देण्यात येणार आहे. रोहिणी संतोष भोईर या शाळेच्या शिक्षिका आहेत. बदलते राहणीमान, आजारावर मात कशी करावी, सामाजिक समस्या, आयुर्वेद योग अंगभूत कलागुण सादर करणे, मनोरंजन, खेळ असे विषय येथे शिकवले जाणार आहेत. त्याचबरोबर आजी आजोबांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे शाळेचे संस्थापक योगेंद्र बांगर यांनी सांगितले.

भारतासह परदेशात प्रसिद्ध झालेल्या फांगणे गावच्या आजीबाईंच्या शाळेपाठोपाठ तालुक्यतील शेलारी म्हाड्स गावच्या सीमेवर रविवारी (ता. 29) आजी आजोबा साठी शाळा सुरू झाली. 20 आजीबाई व 15 आजोबांनी पहिल्याच दिवशी या शाळेला हजेरी लावली. शाळेत नव्यानेच जाणाऱ्या आजीबाई पिवळी लुगडी घालून मिरवत होत्या त्यांच्या स्वागतासाठी गुलाबी रंगाचा गणवेश घातलेल्या फांगणे शाळेतील आज्जीबाई व त्यांच्या शिक्षिका शीतल मोरे हजर होत्या.       

पहावे तिकडे झाडेच झाडे. भर दुपारी पडलेली त्यांची गर्द सावली आणि त्या सावलीत पसरलेल्या सतरंजीवर विसावलेले आजी आजोबा आणि त्यांच्या शाळा प्रवेशाच्या सोहळ्यासाठी जमलेली पाहुणे मंडळी शेलारी व म्हाड्स गावच्या सीमेवर एकांतात असलेल्या निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये शाळेसाठी भाताच्या पेंढयाने शाकारलेली व सजवलेली झोपडी व अक्षरांनी सजवलेला औदूंबर वृक्ष सर्वांचे लक्ष वेधून घेत होता आजी आजोबा शाळेला शुभेच्छा देण्यासाठी ईशस्तवन, स्वागत गीत इतकेच काय पाहुण्यांची भाषणे यासाठी स्पीकरची गरज भासली नाही एवढी निरव शांतता येथे होती.

शाळेचे उदघाटन अंबरनाथ येथील प्रसिद्ध उद्योजक व मोतीराम दलाल ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप दलाल यांचे हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मुरलीधर दळवी, सामाजिक कार्यकर्ते बाळूमामा करलग, शांताराम बांगर, श्रुती शर्मा, सुरेखा ठकेकर भारती देशपांडे उपस्थित होते. आज्जीबाईंच्या शाळेचे निर्माते योगेंद्र बांगर यांनीच ही शाळा सुरू करण्यात पुढाकार घेतला आहे. शेलारी गावातील पाच कातकरी कुटुंबे शाळेतील आजी आजोबांची व्यवस्था पाहणार आहेत. या अनोख्या शाळेत पाठ्य पुस्तकाऐवजी जीवनाचे शिक्षण देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com