लिफ्ट नको स्वच्छतागृह हवे!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

शिवडी -  रेल्वे प्रशासनाकडून शहरातील अनेक स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे; मात्र हे सुशोभीकरण करताना महिलांसाठी आवश्‍यक असलेल्या स्वच्छतागृहाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप महिला प्रवाशांकडून करण्यात येत आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रोड रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट लावण्यात येत आहेत, परंतु महिलांची मूलभूत गरज असलेल्या स्वच्छतागृहाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या स्थानकातील महिला प्रवाशांनी ‘लिफ्ट नको स्वच्छतागृह हवे’ असा नारा देत नाराजी व्यक्त केली आहे.

हार्बर मार्गावरील वडाळा रोड स्थानकातून पनवेल व अंधेरीसाठी लोकल सुटतात. त्यामुळे हार्बर व पश्‍चिम रेल्वेवरील प्रवाशांना हे स्थानक सोईचे ठरते. या स्थानकातून ८० हजार प्रवासी रोज प्रवास करतात. त्यात ३० टक्के महिला प्रवासी आहेत. असे असले, तरी या स्थानकात महिलांसाठी पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने महिलांची कुंचबणा होते. फलाट क्रमांक एक व चारवर पनवेलच्या दिशेला स्वच्छतागृह आहेत; मात्र ती एका कोपऱ्यात असल्याने त्याचा वापर करणे महिलांना असुरक्षित वाटत असल्याने त्या तेथे जाणे टाळतात. फलाट क्रमांक २ व ३ वर असलेल्या वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या सोयीसाठीही या फलाटांवर स्वच्छतागृह नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यातील ४० महिला पोलिसांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छतागृहाची गरज असतानाही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महिला प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ, अपंग, गर्भवती आणि किडनी रोग असलेल्या प्रवाशांची वडाळा रोड स्थानकावर स्वच्छतागृहाअभावी प्रचंड गैरसोय होते. रेल्वे प्रशासनाने महिलांच्या या समस्येची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे प्रवासी महिला कोमल पंदारे यांनी सांगितले.

प्रवाशांची वाढत्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाने १५ डब्यांच्या लोकल सुरू केल्या. जादा पादचारी पूल, स्वयंचलित जिने, लिफ्ट उभारल्या; मात्र प्रवाशांची मूलभूत गरज लक्षात घेऊन स्वच्छतागृह आणि पाणपोईची पुरेशी व्यवस्था स्थानकात नाही.
- सुषमा पांचाळ, महिला प्रवासी

महिलांच्या सुरक्षिततेबाबत व प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन कमी पडत आहे. प्रवाशांच्या सुविधांसाठी केलेल्या पत्रव्यवहाराला प्रशासन केराची टोपली दाखवत आहे. 
- अभिजित धुरत, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ

Web Title: marathi news toilet women railway