कुणबी संमेलनाचे शानदार उद्घाटन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जानेवारी 2018

वाडा : इंग्लंड सारख्या देशात शेतीत सरकारची भागिदारी ही 85 टक्के आहे. तर भारता सारख्या देशात खते, बियाणे, औषधे व काही योजनातील सबसिडी सरकार देऊन शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. ही भागीदारी नाममात्र असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे मत माजी खासदार नाना पाटोळे यांनी येथे व्यक्त केले.

वाडा : इंग्लंड सारख्या देशात शेतीत सरकारची भागिदारी ही 85 टक्के आहे. तर भारता सारख्या देशात खते, बियाणे, औषधे व काही योजनातील सबसिडी सरकार देऊन शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. ही भागीदारी नाममात्र असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे मत माजी खासदार नाना पाटोळे यांनी येथे व्यक्त केले.

वाडा तालुक्यातील गांध्रे येथील लडकू नाना भोईर मैदानावर शुक्रवारी (दि.26) कुणबी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नाना पाटोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील हे होते. नाना पाटोळे पुढे म्हणाले की, देशातील 70 टक्के ग्रामीण व्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेतीबाबतचे सरकारचे धोरण नकारात्मक बघायला मिळत आहे. त्यामुळे सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. उलट त्यात वाढ होत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर शेतीसाठी वेगळे बजेट जाहीर व्हायला हवे असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकारची शेतकऱ्यांविषयी असलेली भूमिका ही विरोधात्मक आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मोदी सरकारच्या नोटबंदी, स्वच्छता मोहिमेची त्यांनी खिल्ली उडवली. या सरकारच्या काळात वीज बिले, पेट्रोल, डिझेल, सिलेंडर गॅसचे भाव भरमसाठ वाढले असून स्वच्छता अभियानात गोरगरीब जनतेलाच मोदी सरकारने साफ केल्याचे सांगितले. पंधरा लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा झाले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद व शासकीय शाळा बंद करण्याचा घाट कायदा आणून बिगर आदिवासींवर अन्याय मोदी सरकारने चालवला आहे. बहुजन समाजाच्या विरोधी असलेले हे सरकार असून आता बहुजनांना स्वाभिमानाने जगायचे असेल तर निती युध्दाची तयारी करा असे आवाहन पाटोळे यांनी बोलताना केले. 

यावेळी अध्यक्षीय भाषणात विश्वनाथ पाटील यांनी काळी आई संकटात असून तिला वाचवायचे असेल तर देशातील 55 टक्के कुणबी समाजाने एकत्र आले पाहिजे. आरक्षण असो भूमिसंपादन असो शेतीचा प्रश्न असो असे अनेक अन्याय हे सरकार बहुजनांवर करीत असून त्यासाठी किमान कार्यक्रम ठरवून समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. संमेलनाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात कुणबी तरूणांनी आधुनिक शेतीची कास धरण्याचे आवाहन केले. चला तरूणांना उद्योजक घडवूया ही या संमेलनाची टॅग लाईन असल्याचे त्यांनी सांगितले. 

उद्घाटनाच्या प्रारंभी वाडा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत कुणबी तरूण तरूणी महिला पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. बैलगाडी, ट्रॅक्टर ही यात्रेत होते. महिला ट्रॅक्टर चालवत होत्या त्यामुळे महिलाही मागे नाहीत यावरून हे दाखवून देण्यात आले होते. महिलांनी 'उदे ग आंबे उदे' या गाण्यावर सादर केलेले लेझीम नृत्य हे डोळ्यांचे पारणे फेडणारे झाले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कुणबी बांधव व आजी माजी सैनिकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज डॉ. बापूसाहेब मोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार दिगंबर विशे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी, वाडा पंचायत समितीचे उपसभापती सभापती धनश्री चौधरी, वाडा पंचायत समितीचे उपसभापती सभापती जगन्नाथ पाटील, सदस्य मेघना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Marathi news wada news kunabi sammelan