ओखी वादळाच्या तडाख्याने प्रचार गारठला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

आज ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे सर्व प्रचार यंत्रणा कोलमडली आहे. प्रचाराने गरम झालेले, जव्हार मधील वातावरण थंडी, वारा आणि पावसामुळे गारठले आहे.

मोखाडा - ओखी वादळाच्या तडाख्याने, सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीचे, खळ्यात रचलेले उडवे, धान्य आणि वीटभट्ट्यांचे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यात जव्हार, डहाणू आणि वाड्यात निवडणूकीमुळे वातावरण गरम झाले होते. आज ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या वादळी पावसामुळे प्रचारही गारठला आहे. 

थंडी, वारा आणि पावसामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी घरातच राहणे पसंत केले आहे. जव्हार बाजारपेठेत शुकशुकाट होता. नगरपरिषदेच्या निवडणुकीत, उमेदवारांना प्रचारकरण्यासाठी कमी अवधी मिळाला आहे. त्यामुळे कमी वेळात मतदारांपर्यत पोहचण्यासाठी उमेदवार गृहभेटी आणि प्रभागातील गल्लीबोळात प्रचार फेऱ्या काढत आहेत. त्यासाठी दररोजची रणनिती व वेळापत्रक उमेदवार आणि कार्यकर्ते आखतात. मात्र, आज ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे सर्व प्रचार यंत्रणा कोलमडली आहे. प्रचाराने गरम झालेले, जव्हार मधील वातावरण थंडी, वारा आणि पावसामुळे गारठले आहे. या वातावरणामुळे कार्यकर्त्यांना उसंत मिळाली आहे. तर दररोजच्या ध्वनीक्षेप आणि उमेदवारांच्या भेटी, प्रचार फेऱ्यापासून मतदारांना ही आराम मिळाला आहे. एकूणच ओखीचा तडाखा शेती, वीटभट्टी या व्यवसायांबरोबरच पालघर जिल्हयातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीलाही बसला आहे. 

Web Title: Marathi News_Okhi_Mokhada_Elections