मराठी-अमराठी वादावर पक्षांची भूमिका गुलदस्तात

आरोप-प्रत्यारोप; शेवटच्या टप्प्यांत राज्यातील प्रचाराचा रंग बदलण्याची शक्यता
marathi people dispute over job and political campaign shiv sena mumbai
marathi people dispute over job and political campaign shiv sena mumbaiSakal

- पांडुरंग म्हस्के

Mumbai News : मराठी व्यक्तीला नोकरी नाकारणारी जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर मराठी माणसांचा रोष शमतो न शमतो तोच घाटकोपर येथे एका गुजरातीबहुल सोसायटीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याची घटना घडली.

या घटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडल्याने मराठी-अमराठी वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांनी मात्र बोटचेपी भूमिका घेतल्याने हा वाद प्रचाराचा मुद्दा ठरला नाही. मराठी माणसाला नोकरी नाकारणारी एका खासगी कंपनीची जाहिरात लिंक्डइन समाजमाध्यमावर दोन दिवसांपूर्वी प्रसारित झाली आणि मराठी अस्मिता उफाळून आली.

वेब डिझाइनरपदासाठी एका कंपनीने फ्रीलान्स करणाऱ्या एचआर कंपनीने जाहिरात दिली होती. गिरगावसारख्या मराठमोळ्या विभागात या पदाची नियुक्ती होती. पण ही जाहिरात ट्रोल होताच संबंधित कंपनीने आणि या पदाची भरती करणाऱ्या एच आर कंपनीने माफी मागितली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हा मुद्दा निघाल्याने यावर चर्चा सुरू झाली.

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजकीय पटलावर ही घटना आणून वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फारशी धार दिसली नाही. केवळ गिरगाव पुरताच हा निषेध मर्यादित राहिला.

दुसरी घटना घाटकोपर येथील एका उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीत घडली. तेथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांना प्रचारासाठी जाऊ दिले नाही, असा आरोप करण्यात आला. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शाखा प्रमुख प्रदीप मांडवकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह संबंधित सोसायटीमध्ये प्रचारासाठी पत्रके वाटण्यास मज्जाव केला.

तर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या सोसायटीमध्ये खासदार मनोज कोटक यांची काही मतदारांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन सोसायटीमधील वातावरण गढूळ करायचे नव्हते.

त्यामुळे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांना नंतर येण्यास सांगितले. या दोन्ही तथाकथित घटना मराठी माणसाची गळचेपी करणाऱ्या असल्याचा आरोप शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करण्यात आला. मात्र हा वाद फार वाढवला गेला नाही. याचे कारण म्हणजे सध्या काँग्रेस पक्षासमवेत असलेली आघाडी.

मराठी अमराठी वाद वाढवला तर काँग्रेससोबत असलेली अमराठी मते दूर जाऊ शकतात, अशी भीती शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वाटत असावी. त्यामुळे हा विषय स्थानिक पातळीवरच शांत केल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा प्रकार भाजपच्या वतीने जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. गुजराती मते एकत्रित करून ती भाजपकडे यावीत हा यामागचा उद्देश असल्याचे शिवसेनेकडून बोलले जात आहे.

ठाकरे गटाचा दावा भाजपने फेटाळला

घाटकोपर येथील घटनेबाबत बोलताना भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट यांनी मात्र शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याचा दावा फेटाळून लावला. ‘‘मुळात त्यावेळी सोसायटीत मनोज कोटक यांची बैठक सुरु असल्याने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केवळ दोन कार्यकर्त्यांना पत्रके वाटण्यास आत सोडण्यात आले, त्यामुळे अनावश्यकरित्या याचा बाऊ केला जात आहे, ’’असे शिरसाट यांचे म्हणणे आहे.

मनसेची भूमिका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आता केवळ मतांसाठी हा कांगावा करीत असल्याचा दावा केला. कसेही करून वादंग माजवायचा प्रयत्न करून मराठी मतदारांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न शिवसेनेकडून(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘‘गुजराती समाजाला विरोध करणारी शिवसेना मागील निवडणुकीत ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, तसेच ‘केम छो वारली’ असा गुजराती भाषेत प्रचार करीत होती. तेव्हा कुठे गेले होते मराठी प्रेम असा प्रश्न देशपांडे यांनी केला.

मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रकार हा मनसेचा विषय आहे, मात्र घाटकोपर येथे झालेलं प्रकार हा राजकीय फायद्यासाठी केलेला असल्याने ‘मनसे’ या विषयात पडणार नाही, असे मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.

प्रतिसाद पाहून भाजप बिथरला : ठाकरे गट

‘‘ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा यांच्यापेक्षा संजय पाटील यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद महाप्रचंड आहे. कदाचित त्यामुळेच बिथरल्यामुळे भाजपने स्वतःहून या लोकसभा निवडणुकीला आधी हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि नंतर मराठी भूमिपुत्र विरुद्ध गुजराती असे रूप दिले,’’ असे मत नुकतेच शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आलेले कीर्तिकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com