मॅरेथॉन आयोजनासाठी खिसे खाली करा !

सुजित गायकवाड
सोमवार, 17 जून 2019

- नवी मुंबई महापालिकेचे नवे धोरण
- बोधचिन्ह वापरासाठी दहा हजार रूपये मोजावे लागणार
- अस्वच्छतेची किंमत मोजावी लागणार 

 

नवी मुंबई : स्वतःची अथवा स्वतःच्या कंपन्यांची जाहीरात करण्यासाठी आजकाल सर्रासपणे राबवल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांचे शहरामध्ये उत आले आहे. अशा व्यावसायिक मॅरेथॉनच्या आयोजनासाठी महापालिकेने थेट शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याकरीता एक धोरण तयार केले असून यात महापालिकेचे बोधचिन्हाचा वापर करण्यासाठी आयोजकांना दहा हजार रूपये मोजावे लागणार आहेत. तर मॅरेथॉनच्या अंतरानुसार 50 हजारापासून अगदी दोन लाख रूपयांचा शुल्क आकारला जाणार आहे. 

धकाधकीच्या आयुष्यात सतत व्यस्त असल्यामुळे मानवी शरीराराला जडलेल्या रोगातून मूक्ती मिळवण्यासाठी व्यायामावर अधिक भर दिला जात आहे. सकाळी धावणे अथवा चालण्याकडे युवा पिढाचा अधिक कल आहे. याचाच फायदा घेत सद्या नवी मुंबई शहरात मागील काही महिन्यांपासून मॅरेथॉन व वॉकेथॉन अशा स्पर्धांचे आयोजनाचे प्रमाण वाढले आहे. शहराचे क्विन नेकलेस म्हणून परीचित असलेल्या पामबीच रस्त्याची मॅरेथॉन आयोजनाला सर्वाधिक पसंती आयोजकांकडून आहे. मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनातून शहरभर फलकबाजी करून स्वतःच्या उत्पादनाची जाहीरात करण्याचा नवा ट्रेन्ड आता इव्हेंन्ट कंपन्यांच्या माध्यमातून रुजत आहे. या आयोजनातून महापालिकेचा रस्ता, वीज, पाणी, आदी पायाभूत सुविधा वापरल्या जाऊन पदरी काहीच पडत नसल्याने प्रशासनाने मॅरेथॉन स्पर्धांच्या अंतराप्रमाणे शुल्क आकारले आहे. यात 42 किलो मीटरच्या पूर्ण मॅरेथॉन आयोजनाकरीता दोन लाख रूपये शुल्क व 50 हजार रूपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे.

21 किलो मीटर अंतरावरील हाफ मॅरेथॉनच्या आयोजनाकरीता एक लाख रूपये शुल्क व 25 हजार रूपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे. हाफ मॅरेथॉनपेक्षा कमी अंतर असेल तर 50 हजार रूपये शुल्क व 25 हजार अनामत रक्कम घेतली जाईल. विशेष सामाजिक संदेश देण्यासाठी मोफत आयोजन केल्यास शुल्क आकारले जाणार नाही. मात्र अनामत रक्कम म्हणून दहा हजार रूपये द्यावे लागणार आहे. तसेच व्यावसायिक दृष्टीने वॉकेथॉनचे आयोजन करणाऱ्यांना 50 हजार रूपयांचे शुल्क व 25 हजार रूपये अनामत रक्कम द्यावी लागेल. हा प्रस्ताव प्रशासनातर्फे सर्व साधारण सभेत सादर केला आहे. त्यावर सभेच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष अमलबजावणीला सुरूवात होईल. 

अस्वच्छतेची किंमत मोजावी लागणार 
नवी मुंबई शहरात मॅरेथॉन अथवा वॉकेथॉनचे आयोजन झाल्यावर ज्यारस्त्यांच्या दरम्यान या स्पर्धांचे आयोजन असते. त्यामार्गावर स्पर्धकांकडून प्लास्टिकच्या बाटल्या, खाऊची पाकीटे आदी बाबी फेकून दिल्या जातात. आपला उद्देश सफल झाल्यावर आयोजक ही अस्वच्छतेकडे पाहत नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर झालेली घाण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छ करावी लागते. परंतू अशा घटनांना आळा आणण्यासाठी एखाद्या आयोजकाने दूर्लक्ष केल्यास त्याची अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathon planning in navi mumbai corporation area are payable