मुलाचे लैंगिक शोषण केल्याबद्दल, विवाहितेवर "पोक्‍सो'खाली गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

कुर्ला येथे राहणा-या महिलने अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन लैंगिक शोषण केल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केले आहे.

मुंबई : कुर्ला येथे राहणाऱ्या 38 वर्षांच्या विवाहित महिलेने 16 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. या महिलेवर "पोक्‍सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने तिला 21 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कुर्ला येथून 16 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नेहरूनगर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्याच वेळी ही महिलाही बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने दाखल केली होती. नाश्‍ता करून येतो, असे सांगून हा मुलगा 29 जुलैला सकाळी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर हे दोघे वांद्रे रेल्वेस्थानकात भेटले. तेथे या महिलेने त्याचा आणि स्वत:चा मोबाईल आणि सिम कार्ड नष्ट केले. त्यानंतर ते दिल्लीला गेले. तेथे घर न मिळाल्यामुळे ते गुजरातमधील वडोदरा आणि त्यानंतर नवसारीला आले. तेथे 11 ऑगस्टपर्यंत राहिल्यानंतर ते पुन्हा मुंबईत आले.

 

मुलाने केला लैंगिक शोषणाचा आरोप
बेपत्ता होण्यापूर्वी हा मुलगा संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. हे दोघे कुर्ला येथे रेल्वेमार्गालगतच्या झोपडपट्टीत राहत असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. या महिलेने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुलाने केला आहे. त्याच्या जबानीनुसार पोलिसांनी या महिलेवर बालअत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अपहरणाचा गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married women got arrested for Sexual abuse of a child in mumbai