रेल्वे प्रवासात मास्क बंधनकारक; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

सुनिता महामुणकर
Friday, 30 October 2020

राज्य सरकार रेल्वे प्रवासाची सुविधा सर्वांना लवकरच सुरू करणार असली तरी प्रवासात मास्क वापरणे बंधनकारक असून, मास्क न वापरणाऱ्यांकडून रेल्वे पोलिस पथक दंड वसूल करतील, अशी माहिती राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाला गुरुवारी देण्यात आली. 

मुंबई : राज्य सरकार रेल्वे प्रवासाची सुविधा सर्वांना लवकरच सुरू करणार असली तरी प्रवासात मास्क वापरणे बंधनकारक असून, मास्क न वापरणाऱ्यांकडून रेल्वे पोलिस पथक दंड वसूल करतील, अशी माहिती राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाला गुरुवारी देण्यात आली. 

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

मागील सहा महिन्यांपासून रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या नोकरदार कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी यापुढे रेल्वे प्रवास करताना सुरक्षेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. यामध्ये चेहऱ्यावर मास्क वापरायला हवा आणि जर तो लावला नसेल तर रेल्वे पोलिस प्रवाशांकडून दंड वसूल करू शकतात. यापूर्वी मुंबई पोलिसांना असे अधिकार दिलेले आहेत, अशी माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली. रेल्वे गाडीतून प्रवास करण्याबाबत दाखल जनहित याचिकांवर गुरुवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

दरेकरांचा तटकरेंविरुद्ध शड्डू, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

महिला प्रवासी, वकील, मेट्रो कर्मचारी आणि खासगी सुरक्षा रक्षकांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली आहे. यामध्ये अधिक प्रवासी मंजुरी देण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यपद्धतीवर विचार सुरू आहे. त्यानुसार रंगीत सांकेतिक ई-पासचा अवलंब करण्याचा विचार सुरू आहे, असे कुंभकोणी यांनी सांगितले. रेल्वे प्रवासात मास्क वापरणे सुरक्षेसाठी बंधनकारक आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांना दंड आकारण्याची मुभा दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रवास विशिष्ट वेळेत नियोजन पद्धतीने करण्यासाठी रेल्वे विभागाकडून मान्यता दिली जाते. त्यामुळे लवकरच हा प्रवास सुरक्षा व्यवस्थेसह सुरू होण्याची शक्‍यता आहे. लॉकडाऊननंतर मागील सहा महिन्यांपासून रेल्वे प्रवास बंद झाला आहे. 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mask binding on train travel State Government Information in High Court