
मुंबई, ता. 7 : केंद्राने ठरवलेल्या किंमतीपेक्षाही राज्यात मास्कचे दर कमी होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने मास्कचे दर खाली आणण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. मास्क निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना या तज्ज्ञांनी भेटी दिल्या, कच्चा माल, उत्पादन मूल्य या सर्वांची गोळाबेरीज करुन मास्कचे कमीत कमी दर किती असावेत याचा या समितीने आढावा घेतला होता. या अभ्यासानंतर समितीने राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला आहे. यावर राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे.
चार सदस्यीय समितीने एन-95 मास्कची किंमत 135 वरुन 19 रुपये, ट्रिपल लेयर मास्कची किंमत 16 रुपयावरुन 4 रुपये, तर, दोन लेयर असलेला मास्कचे दर 10 रुपयावरुन 4 रुपयांपर्यंत आणण्याची शिफारस केली आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात मास्क निर्मिती करणाऱ्या कंपनीने भरमसाठ नफा कमावला आहे. गेल्या काही वर्षाचे विक्रीचे आकडे बघता कोरोना संसर्गाच्या काळात अनेक कंपन्यांनी मास्क विक्रीतून 40 ते 60 टक्के नफा कमावला आहे, असंही या समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
महत्त्वाची बातमी : "खडसे - पवार" भेटीबाबत स्वतः शरद पवारांनी केला महत्त्वाचा खुलासा
केंद्र सरकारने मार्च महिन्यात मास्क आणि सॅनिटाझर या अत्यावश्यक वस्तूमध्ये समाविष्ट करुन नफेखोरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्र सरकारने या यादीत एन-95 मास्कला वगळले होते. याचा फायदा उचलत उत्पादक कंपन्यांनी भरमसाठ नफा मिळवला. काही कंपन्यांनी मार्च आणि मे महिन्यात 25 रुपयाचा मास्क 150 रुपयामध्ये विकले. म्हणजे या कंपन्यांनी तब्बल सहापठ किंमती वाढवल्या, असंही या अहवालात सांगण्यात आलंय.
केंद्र सरकारने जून महिन्यात मास्कला अत्यावश्यक यादीतून वगळले. मात्र या महिन्यात मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला एन-95 मास्कचे दर आटोक्यात आणण्याचे निर्देश दिले. 31 जुलै रोजी राज्य सरकारने मास्क दरनिश्चितीसाठी चार सदस्यांची तज्ञ समितीची नेमली. या समितीने विनस कंपनी निर्मीती एन-95 मास्कची किंमत 19 ते 49 रुपयापर्यंत, कप शेप मास्कची किंमत 130 वरुन 29 रुपयापर्यंत, तर मॅग्नम कंपनीच्या व्हि शेप मास्कची किंमत 135 वरुन 19 रुपये. याशिवाय फेस फिल्टर मास्क 140 वरुन 12 रुपये करण्याची शिफारस या तज्ज्ञ समितीने राज्य सरकारकडे केली आहे.
महत्त्वाची बातमी : चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर पोस्ट करणं पडलं महागात, दोघा भावांना अटक
समितीच्या शिफारसी सरकारकडे आल्या आहेत. मात्र अजून यावर निर्णय झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोना संसर्गाचा वेग ओसरला असला तरी सर्व नागरीकांना मास्क घालणे बंधनकारक आहे. त्यामुळे दर्जेदार मास्क सर्वसामान्यांना परवडेल या दरात उपलब्ध असण्याची गरज आहे. एका बाजूला पालिका प्रशासन मास्क न घातलेल्या नागरिकांना दंड करते. त्यामुळे एका बाजूला मास्कच्या किंमती सामान्यांच्या अवाक्यात आणणे आणि दूसऱ्या बाजूला नफेखोरी थांबवणे गरजेचे असल्यामुळे दर निश्चितीचा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. यापुर्वी सरकारने कोरोना चाचण्याचे दर कमी केले होते. शिवाय खाजगी रुग्णालयांना ठरवलेल्या दरात उपचार कऱण्याचे बंधनकारक केले होते.
सध्या मास्कच्या किंमती -
- एन 95 - 50 रुपये
- थ्री प्लाय - 25 रुपये
- नॉर्मल कपड्याचे मास्क ( एकदा वापरुन फेकायचे ) - 10 रुपये
एन 95 मास्क ही 5 तासांनंतर वापरु नये -
मास्कच्या वापराबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी अजून समोर आलेल्या नाहीत. एन 95 मास्क होलसेलमध्ये किमान 20 ते 25 रुपयांपर्यंत मिळतात. पण, त्याची किंमत बाजारात जवळपास 100 रुपयांपर्यंत आहे. शिवाय, एन 95 मास्क ही एकदा वापरुन फेकून द्यायचे आहे. त्याचा पुन्हा वापर केला जाऊ शकत नाही. किमान 5 ते 8 तासांच्या वापरानंतर ते फेकायचे असते. मात्र, लोक त्याचा वापर धुवून पुन्हा करतात. याचा अर्थ लोक मास्कच्या किंमती आणि त्याच्या वापराबाबत अजूनही अनभिज्ञ आहेत.
शिवाय, सरकारही यावर नियंत्रण ठेवत नाही. कपड्याच्या मास्कचा वापर करायचा आहे की नाही यासाठीही नियमावली तयार करण्यात आलेली नाही. जर विक्री करणाऱ्या व्यक्तीला एन 95 मास्क 20 ते 25 रुपयाला मिळू शकतो तर सामान्य माणसाला ते मास्क किमान 30 रुपयाला मिळणं अपेक्षित आहे. पण, केमिस्टवाले किंवा मास्क विक्रेते ते वाढीव दराने विकतात. त्याचा फटका सामान्य माणसाला बसतो. असं ऑल फूड अँड लायसन्स होल्डर्स असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे म्हणालेत.
mask rates in maharashtra will soon be reduced committee appointed to regularize rates
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.