मिनी ट्रेन बंद; पर्यटन डब्यात..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

माथेरान - हिरव्यागार वनराईने नटलेल्या; तसेच मुंबई-पुण्यापासून जवळच असलेल्या माथेरानमध्ये वर्षाला सहा ते सात लाखांच्या आसपास पर्यटक येत असत; पण पर्यटकांचे आकर्षण असलेली माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेन सुरक्षेच्या कारणास्तव १७ महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटकांची संख्या जवळपास निम्म्याने घटली आहे. पर्यटनावर आधारित व्यवसाय डबघाईस आले आहेत. 

माथेरान - हिरव्यागार वनराईने नटलेल्या; तसेच मुंबई-पुण्यापासून जवळच असलेल्या माथेरानमध्ये वर्षाला सहा ते सात लाखांच्या आसपास पर्यटक येत असत; पण पर्यटकांचे आकर्षण असलेली माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेन सुरक्षेच्या कारणास्तव १७ महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटकांची संख्या जवळपास निम्म्याने घटली आहे. पर्यटनावर आधारित व्यवसाय डबघाईस आले आहेत. 

जागतिक वारसा लाभलेली ही मिनी ट्रेन नॅरोगेज रुळावर धावणारी महाराष्ट्रातील एकमेव रेल्वे आहे. पर्यटक तिला टॉय ट्रेन असेही म्हणतात.  १९०७ मध्ये अदमजी पिरभोय यांनी सुरु केलेल्या या मिनी ट्रेनला युनेस्कोने हेरिटेज दर्जा दिला आहे. १ मे व ८ मे २०१६ ला किरकोळ अपघात झाल्यामुळे रेल्वेने सुरक्षेचे कारण देऊन ही मिनी ट्रेन कालबाह्य झाल्याचे सांगत अनिश्‍चित काळासाठी बंद केली आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यांतून नागमोडी वळणे घेत धावणाऱ्या या गाडीचा आनंद घेण्यापासून पर्यटकांना वंचित राहावे लागत आहे. त्यातच माथेरानला जाणाऱ्या धोकादायक घाटमार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. 

माथेरानमध्ये शेती किंवा उद्योग नसल्याने फक्त पर्यटनावर स्थानिकांचे जीवनमान अवलंबून आहे. पर्यटक कमी झाल्याने स्थानिक कर्जबाजारी झाले आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मिनी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात लोकसभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी शरद पवार यांच्या कानावर हा प्रश्‍न घातला आहे. त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेटही घेतली. अखेर रेल्वेने मिनी ट्रेनचे काम सुरू करण्यासाठी सात कोटी रुपये मंजूर करून निविदा काढली. या कामांना सुरुवातही झाली. माथेरानच्या नागरिकांना पुन्हा सुगीचे दिवस येतील असे वाटले; पण आजतागायत परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. 

अनिश्‍चितता कायम 
मिनी ट्रेनच्या मार्गावर सुरक्षा कठडे बांधण्याचे काम जवळ जवळ पूर्ण.
मालवाहू गाडी दररोज फेऱ्या मारते; परंतु प्रवासी सेवेबाबत रेल्वे प्रशासनाने मौन बाळगले आहे. 
रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी मिनी ट्रेनची पाहणी केल्यानंतरही सेवा सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता आहे.

माथेरानची मिनी ट्रेन बंद झाल्यापासून आमच्या घोडे-व्यवसायावर बराच विपरीत परिणाम झाला आहे. पर्यटकांची संख्या रोडावल्यामुळे आम्ही घोड्याला काय खाऊ घालायचे व आम्ही काय खायचे, असा गहन प्रश्‍न आमच्यासमोर उभा ठाकला आहे.
- उमेश घावरे, घोडामालक, माथेरान

Web Title: matheran news mini train