माथेरानची मिनी ट्रेन लवकरच रुळावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

अमन लॉज ते माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन सेवा नाताळपूर्वी (25 डिसेंबर) सुरू होणार आहे.

मुंबई, ता. 15 : अमन लॉज ते माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन सेवा नाताळपूर्वी (25 डिसेंबर) सुरू होणार आहे. नेरळ ते माथेरान या 22 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीला शुक्रवारी (ता. 15) सुरुवात झाली. या संपूर्ण मार्गावर "माथेरानची राणी' चार महिन्यांनंतर धावू लागेल, असे सांगण्यात आले. 

यंदा मुसळधार पावसामुळे नेरळ ते माथेरानदरम्यान रेल्वेमार्गाचे 22 ठिकाणी मोठे नुकसान झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने मिनी ट्रेन सेवा बंद केली. नेरळ-माथेरान या 22 किलोमीटरच्या संपूर्ण रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. या कामासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात येईल. 
जेसीबी, दोन मिक्‍सर आदी यंत्रसामग्रीच्या मदतीने 60 कामगार चार महिन्यांत हे काम पूर्ण करतील. त्यानंतर पुढील वर्षी मार्चपासून मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. नेरळ ते माथेरान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी साहित्य पोहोचवण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. या भागात रस्ता वाहतूक नसल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगनंतर साहित्य वाहून नेले जात आहे. 

रेल्वेने 15 दिवसांपूर्वी माथेरान येथे पिट लाईनचे काम सुरू केले. हे काम 20 ते 25 दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू करण्यात येईल. मिनी ट्रेनला असलेली प्रवाशांची पसंती लक्षात घेऊन 25 डिसेंबरपूर्वी शटल सेवा सुरू करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नेरळ ते माथेरान स्थानकांदरम्यान दिवसभरात मिनी ट्रेनच्या सहा फेऱ्या होतात. मिनी ट्रेनमधून महिन्याला सुमारे 90 हजार पर्यटक प्रवास करतात. त्यामुळे मिनी ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. 

दोन वर्षांपासून प्रतीक्षाच 

जानेवारी ते मे 2016 या काळात दोन वेळा मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मिनी ट्रेन बंद करण्यात आली होती. रेल्वे मंत्रालयाने नेरळ ते माथेरान मार्गाचा सुरक्षितता अहवाल तयार करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मध्य रेल्वेने दुरुस्तीची कामे करून ऑक्‍टोबर 2017 मध्ये अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू केली; परंतु नेरळ ते माथेरान या संपूर्ण मार्गावर मिनी ट्रेन सेवा सुरू करण्यात रेल्वेला अपयश आले. त्यातच यंदा मुसळधार पावसामुळे मिनी ट्रेनच्या मार्गाची वाताहत झाली आहे. 
 

web title : Matheran's mini train will run soon 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matheran's mini train will run soon