बोकडाच्या नावाखाली शेळीचे मटण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

शहरातील मटणविक्रेते बोकडाच्या नावाखाली शेळीच्या मटणाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करून रोज हजारो रुपयांचा नफा कमावत आहेत.

तुर्भे - शहरातील मटणविक्रेते बोकडाच्या नावाखाली शेळीच्या मटणाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करून रोज हजारो रुपयांचा नफा कमावत आहेत. बोकडाच्या तुलनेत शेळी स्वस्त आहे. त्यामुळे तिचे मटण विकताना ते बोकडाचे असल्याचे भासवून बोकडाच्या दराने विकणे ही ग्राहकांची फसवणूक आहे.

नवी मुंबईत साधारण ४५० मटणविक्रीची दुकाने आहेत. यातील बहुतांशी मटणविक्रेते बोकडाचे मटण ५०० ते ५२० रुपये किलोने विकत आहेत. बोकडाच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगून ते मटणाचे भाव बिनबोभाट वाढवतात. त्यांच्या भावावर कुणाचेही नियंत्रण नाही. परंतु शेळी बोकडापेक्षा स्वस्त असल्याने तिचे मटण बोकडाच्या दरात विकून ग्राहकांची बिनधास्त फसवणूक केली जात आहे. शेळीचे मटण लवकर शिजत नाही. त्याची चवही बोकडाच्या मटणासारखी नसते. त्यामुळे शेळीचे मटण कुणी फारसे घेत नाही. असे असताना काही विक्रेते मटण बोकडाचे आहे, असे भासवून शेळीचे मटण विकतात आणि ग्राहकांची फसवणूक करतात.

 याबाबत घणसोलीतील भाजप युवक प्रभाग अध्यक्ष रवींद्र राजीवडे यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. 

बोकडाची किंमत साधारणतः आठ हजारांपासून २० हजारांपर्यंत आहे. परंतु शेळीची किंमत बोकडाच्या किमतीच्या निम्मीच असते. त्यामुळे विक्रेत्यांना भरपूर नफा मिळतो. त्यामुळे ते ग्राहकांना याचा सुगावाही लागू न देता बोकडाचे म्हणून शेळीचे मटण विकून त्यांची फसवणूक करतात. काही ग्राहकांना हे माहीत आहे; परंतु याची तक्रार करायची कुणाकडे, हे कळत नसल्याने ते गप्प बसतात, असे त्यांनी निवेदनात  म्हटले आहे.

बुधवार, शुक्रवार आणि विशेषतः रविवारी मटण खरेदीसाठी खवय्ये गर्दी करतात. त्याचा फायदा घेऊन अनेक मटणविक्रेते शेळीचे मटणच जास्त प्रमाणात विकतात.
- शामराव पाटील, रहिवासी

एकगठ्ठा बोकड खरेदी करतो. त्या वेळी विक्रेता शेळी विकत घेतल्याशिवाय बोकड देत नाही. त्यामुळे नाइलाजाने शेळीही खरेदी करावी लागते.
- चाँद हाजी कुरेशी, नवी मुंबई बकरा कसाब जमात

Web Title: meat sellers in mumbai fools people by selling goat meat instead of buck meat