esakal | कोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा

रुग्णांसह नातेवाईकांची हेळसांड

कोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

ठाणे - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाने औषध खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी अद्याप औषध खरेदी झाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. 

हेही वाचा - कोरोनामुळे ४० दिवसांनी आलं पार्थिव घरी

ठाणे महापालिका क्षेत्रात 30 प्राथमिक आरोग्य केंद्रे व दवाखाने असून टेंभी नाका येथे वाडिया रुग्णालय आणि कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. कळवा रुग्णालयात ठाणे व पालघर जिल्ह्यातून दररोज हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. वैद्यकीय महाविद्यालय असल्याने शेकडो रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात. रुग्णालयाचा व्याप मोठा असल्याने दरवर्षी या रुग्णालयावर 100 कोटींहून अधिक निधी खर्च होत असतो. यावरून काही दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेत रुग्णालय प्रशासनाचे वाभाडे निघाले होते; तर रुग्णालयाच्या अधीक्षकपदी नेमण्यात आलेल्या डॉक्‍टरबाबत अनेक आक्षेपदेखील नोंदवण्यात आले होते.

हेही वाचा - कोरोनाचा गैरसमज आणि मुंबईत मटन टंचाई

कळवा रुग्णालयातील रुग्णांना आवश्‍यक असलेली औषधखरेदी पालिकेचा आरोग्य विभाग निविदाप्रक्रियेच्या माध्यमातून खरेदी करत असतो. रुग्णालयातील विभागप्रमुख आपापल्या विभागात आवश्‍यक असलेल्या औषधांची यादी सादर करतात, त्यानुसार ही खरेदी केली जाते; मात्र ही औषध खरेदीच अद्याप झाली नसल्याचे समोर आले आहे. अनेक रुग्णांना अपुरी औषधे दिली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही रुग्णांना तर अत्यावश्‍यक औषधेदेखील उपलब्ध होत नाहीत. किंबहुना, रुग्णालयातील मेडिकल स्टोअर बंद असल्याने काही औषधे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरच्या मेडिकल स्टोअरमधून आणण्यास सांगितले जाते. यामुळे वेळेचा अपव्यय होऊन औषधांअभावी एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतल्यास कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित होत आहे. 

औषध खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून स्थायी समितीनेही 646 औषध प्रकारांच्या खरेदीसाठी 18 निविदाकारांच्या निविदांवर मंजुरीची मोहोर उठवली आहे. 
- डॉ. अनिरुद्ध माळगावकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका. 


कोरोनामुळे भीषण औषधटंचाई 

चीनसह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेसह औद्योगिक क्षेत्र आणि आरोग्य यंत्रणाही कोलमडून पडत आहे. जेनेरिक औषधांच्या उत्पादनात जगातल्या प्रमुख 20 कंपन्यांपैकी आठ कंपन्या भारतीय आहेत, पण आजही या औषधांच्या निर्मितीसाठी भारत चीनवर अवलंबून आहे आणि या औषधांच्या निर्मितीसाठी चीनमधून 80 टक्के ऍक्‍टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्‌स अर्थात कच्चा माल आयात केला जातो. चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याने त्याचा मोठा परिणाम आयात-निर्यातीवर झाला असून कच्चा माल आयात न झाल्याने अनेक औषध कंपन्यांचे उत्पादन घटत आहे. परिणामी औषधे महागण्याची चिन्हे असून भविष्यात औषधटंचाईलाही सामोरे जावे लागणार असल्याची भीती आरोग्य विभागाकडून वर्तवली जात आहे. 
 

web title : medicine scarcity in hospitals due to Corona 

loading image