मीनाक्षी शिंदे ठाण्याच्या महापौर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

ठाणे - ठाणे महापालिकेचे 21 वे महापौर म्हणून सोमवारी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची; तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड झाली. महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या; तर उपमहापौरपदासाठी कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली होती; पण या सर्व उमेदवारांनी निर्धारित वेळेत अर्ज मागे घेतले. निवडीनंतर शिवसैनिकांनी महापालिका परिसरात एकच जल्लोष केला. शिंदे पालिकेच्या चौथ्या महिला महापौर आहेत. 

ठाणे - ठाणे महापालिकेचे 21 वे महापौर म्हणून सोमवारी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची; तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड झाली. महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या; तर उपमहापौरपदासाठी कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली होती; पण या सर्व उमेदवारांनी निर्धारित वेळेत अर्ज मागे घेतले. निवडीनंतर शिवसैनिकांनी महापालिका परिसरात एकच जल्लोष केला. शिंदे पालिकेच्या चौथ्या महिला महापौर आहेत. 

महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी एकहाती बहुमत देत शिवसेनेचे 67 नगरसेवक निवडून दिल्याने महापौर शिवसेनेचाच होणार, हे निश्‍चित होते. शिवसेनेने त्यासाठी मानपाडा पट्ट्यातील नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांना उमेदवारी दिली होती, तर उपमहापौरपदासाठी दिव्यातील नगरसेवक रमाकांत मढवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. महापौरपदासाठी भाजपने आशादेवी सिंग यांना, तर राष्ट्रवादीने अशरिन राऊत यांना उमेदवारी दिली होती. उपमहापौरपदासाठी भाजपने मुकेश मोकाशी, राष्ट्रवादीने आरती गायकवाड आणि कॉंग्रेसने विक्रांत चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता महापौरपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून सरकारकडून नियुक्त असलेले ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे महापालिका सभागृहात आगमन झाले. तत्पूर्वीच इतर पक्षाचे नगरसेवक आले. सर्वात शेवटी 10 वाजवून 50 मिनिटांनी शिवसेनेच्या नगरसेवकांचे सभागृहात आगमन झाले. शिवसेनेच्या सर्व पुरुष आणि महिला नगरसेवकांनी डोक्‍यावर भगवे फेटे बांधले होते. अकरा वाजता कल्याणकर यांनी महापौरपदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जाचे वाचन केले. निवडणूक घेण्यापूर्वी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला. या वेळेत अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने कल्याणकर यांनी ठाण्याच्या 21 व्या महापौरपदी मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. बाहेर शिवसैनिकांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. त्यानंतर उपमहापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया झाली. यातही इतरांनी माघार घेतल्याने रमाकांत मढवी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदींनी महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन केले. 

विरोधकांची संघर्षाची नांदी 
महापौरपदाची निवड झाल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांकडून महापौरपदाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. त्यानुसार सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी अपेक्षा व्यक्त करण्यास सुरवात केली; मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यालयात उपस्थित असल्याने नवनिर्वाचित महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या जागेवर उपमहापौर रमाकांत मढवी यांना बसविले. त्यानंतरही काही नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या; पण माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी महापौरांच्या या वागण्याला आक्षेप घेतला. नव्या सभागृहात महापौरांनी काही काळ बसणे आवश्‍यक असतानाही महापौर निघून गेल्याने या विषयावर भावनाच व्यक्त करायच्या नसल्याचा इशारा देऊन त्यांनी ही चर्चाच थांबविली. जगदाळे यांचा हा इशारा म्हणजे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्षाची नांदी मानली जात आहे. तसेच भाजपचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनीही चुकीची घटना घडल्यास तत्काळ त्यावर आक्षेप घेतला जाणार असल्याचा इशारा दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meenakshi Shinde, Thane Mayor