ठाण्यात तुळशी विवाहाच्या माध्यमातून नेत्रदानाचा संदेश 

ठाणे : तुळशी विवाहात सहभागी झालेले अंध बांधव
ठाणे : तुळशी विवाहात सहभागी झालेले अंध बांधव

ठाणे : कार्तिक शुक्‍ल द्वादशी अर्थात मोठी दिवाळी या दिनापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. तुलसी विवाह पार पडताच लग्नाचे बार उडवण्याची रीत हिंदू संस्कृतीत रूढ आहे. हीच प्रथा परंपरेनुसार साजरी करताना यंदा तुळशी विवाहाला सामाजिकतेची जोड देण्याचा प्रयत्न ठाण्यात दिसून आला. ठाण्यातील जांभळी नाका येथे बाळ गोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ यांच्यावतीने यंदा नेत्रदानाचा संदेश देत तुळशी विवाह साजरा करण्यात आला. या सोहळ्यात नेत्रहीन मुले सहभागी झाली होती. 

बाळगोपाळ मंडळाचे यंदाचे 79 वे वर्ष आहे. यंदाच्या तुळशी विवाहात शेकडो वऱ्हाड्यांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून लागलीच अवयवदानाचे अर्ज देखील भरून दिले. ज्याच्याजवळ ज्या गरजेच्या गोष्टीची उणीव असते त्या व्यक्तीला त्या वस्तूचे महत्त्व विशेषत्वाने कळते, असा एक सिद्धान्त आहे. या सिद्धान्तावरूनच म्हटले जाते, की एका सेकंदाचे महत्त्व किती आहे, हे सेकंदाच्या फरकाने स्पर्धा हरलेल्या व्यक्तीलाच जाणवते. तसेच, आपल्या अनमोल दृष्टीचे महत्त्व किती आहे, याची जाणीव तुम्ही एखाद्या प्रज्ञाचक्षू बांधवाच्या दृष्टीने दुनिया समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हाच जास्त प्रकर्षाने कळते. 

यासाठी नेत्रदान केले तर आपण एखाद्याला दृष्टी देऊन शक्ती प्रदान करू शकतो. यासाठी नेत्रदान करा... असा संदेश ठाण्यातील अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांच्या बाळ गोपाळ मित्र मंडळाच्यावतीने तुळशी विवाह सोहळ्यात देण्यात आला. या सोहळ्यात धडधाकट नागरिकांसह नेत्रहीन मुलांनी देखील सहभाग घेतला. या मंगलप्रसंगी आमदार संजय केळकर, जिव्हाळा महिला मंडळाच्या अध्यक्षा मंजिरी ढमाले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यंदा या तुळशी विवाहाचे 79 वे वर्ष असल्याने नेत्रदानाचा संदेश देऊन सामाजिक दायित्व जपण्यात आले. 

अंधत्व निवारणासाठी चालना 
नेत्रदान या संकल्पनेबाबत आपल्या समाजात अद्याप मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज आहे. या संकल्पनेचा म्हणावा तितकासा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. नेत्रदानाचा संकल्प सोडण्याअगोदर या विषयाची गरज आणि आपल्याला त्यात देता येऊ शकणारे योगदान या मुद्द्यांविषयी समाजाच्या तळागाळात संदेश पोहोचला तरीही मोठ्या प्रमाणावर अंधत्व निवारणासाठी चालना मिळू शकते, तसेच मृत्यूनंतर नेत्रदान करणे सरकारने बंधनकारक केले तर, कुणीही अंध राहणार नाहीत, अशी भावना यावेळी विलास ढमाले यांनी व्यक्त केली. या तुळशी विवाहाच्या माध्यमातून एक दिवसात सुमारे 128 जणानी नेत्रदानाचे फॉर्म भरून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com