
ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गावरील ठाणे ते भिवंडी दरम्यानच्या १२.७ किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे.
Mumbai Metro : मेट्रो ५ प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण
मुंबई - ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गावरील ठाणे ते भिवंडी दरम्यानच्या १२.७ किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील स्थानकांची ६४ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली असून एकूण ७० टक्के भौतिक कामे पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात आले.
मेट्रो मार्गिका ५ च्या पहिल्या टप्प्यात घोडबंदर रोडवरील कापूरबावडी, बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा व धामणकर नाका (भिवंडी) या स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो मार्गिका ५ मुळे ठाणे आणि भिवंडीतील नागरिकांना वाहतुकीची एक नवीन आणि पर्यावरणपूरक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. तसेच उपनगरीय रेल्वे, बेस्ट, टीएमसी बससेवा या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यावर प्रवासाच्या वेळेत साधारणतः २० मिनिटांची बचत होण्याचा अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.
मेट्रो मार्गिका ५ साठी कशेळी येथे केंद्रीय डेपोसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. भूसंपादन आणि निविदा प्रक्रियाचे काम प्रगतिपथावर आहे. अंजूरफाटा येथे रेल्वे ओव्हर ब्रिजकरिता स्पेशल स्टील गर्डरचे खांब बसवण्यात येणार आहेत.
- एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
५५० मीटर लांबीचा पूल
मेट्रो मार्ग ५ च्या संरेखणात कशेळी येथे ५५० मीटर लांबीची खाडी आहे. तिच्यावर मेट्रोचा पूल उभारण्याकरिता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करून १३ खांब उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत आठ खांबांची उभारणी पूर्ण झाली असून प्रत्येक खांबातील लांबी सुमारे ४२ मीटर असणार आहेत.