डिसेंबर 2019 अखेर धावणार दोन मार्गांवर मेट्रो ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

एमएमआरडीए अंतर्गत मेट्रोचे सर्व प्रकल्प मुदतीत पूर्ण व्हावेत, प्रवाशांना सुखद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा आनंद देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कार्यकारी समितीने तीनही मार्गिकांवरील कामांना आज मंजुरी दिली. 

- आर. ए. राजीव, आयुक्त, एमएमआरडीए. 
 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दहिसर ते डीएननगर (मेट्रो 2 अ), डीएननगर ते मानखुर्द (मेट्रो 2 ब) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो 7) या तीनही मार्गांवरील विद्युत आणि यांत्रिकीकरणाच्या कामाला आज मंजुरी दिली. त्यामुळे यापैकी दहिसर ते डीएननगर आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या दोन मेट्रो मार्गांवरील काम पूर्ण करून डिसेंबर 2019 अखेर चाचणी घेण्यात येणार असल्याची शक्‍यता आहे. 

दहिसर ते डीएननगर आणि अंधेरी ते दहिसर मेट्रो मार्गांचे संपूर्ण काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यानंतर 2019 अखेरीस चाचणी घेऊन मार्गांवर मेट्रो धावण्याची शक्‍यता आहे. एमएमआरडीएने मुंबई उपनगरातील मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामध्ये वरील तीनही मार्गिकेच्या विद्युत आणि यांत्रिकीकरणाच्या कामासाठी आज (ता.5) एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या कामाचे कंत्राट स्टर्लिंग ऍण्ड विल्सन या कंपनीला देण्यात आले आहे. मेट्रो 7 मार्गिकेवरील 13 स्थानकांवरील अग्निशोधक आणि अग्निरोधक यंत्रणाही लावण्यात येणार आहे. 

तीनही मार्गांवरील 52 स्थानकांवर स्वयंचलित तिकीट काढण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासह इतर तांत्रिक कामांसाठी डाटामॅटिक्‍स ग्लोबल सर्विसेस आणि ए.ई.पी. टिकीटिंग सोल्युशन एसआरएल या कंपन्यांना संयुक्तपणे काम देण्यात आले आहे. त्याचबरोबर अंबरनाथ महापालिकेच्या क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग 36 वरील साईबाबा मंदिर ते फॉरेस्ट नाका या रस्त्याच्या सुधारणेचे कंत्राट जे. पी. एण्टरप्राईजेस या कंपनीला देण्यासही एमएमआरडीएने आज मंजुरी दिली. 

Web Title: Metro Might be run on two roads after December 2019