महत्त्वाची बातमी : म्हाडामार्फत ठाण्यातील 567 सदनिका पोलिसांना मिळणार

तेजस वाघमारे
Wednesday, 16 September 2020

म्हाडाने 1973 मध्ये ठाणे पोलिस आयुक्तालयाला 856 सदनिका हस्तांतरित केल्या होत्या.

मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेला ठाणे वर्तक नगर येथील पोलिस वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याठिकाणी सुमारे 567 घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून ही घरं वितरीत करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी निकाली काढला आहे.

म्हाडाने 1973 मध्ये ठाणे पोलिस आयुक्तालयाला 856 सदनिका हस्तांतरित केल्या होत्या. परंतु त्यानंतर गेल्या 46 वर्षांमध्ये योग्य प्रकारे इमारतींची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या सर्व इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यापैकी काही इमारती अतिधोकादायक झाल्याने पाडण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित इमारतींमध्ये आजी-माजी पोलिसांची कुटुंब जीव मुठीत धरून जगत आहेत.

महत्त्वाची बातमी : मुंबईकरांनो सावधान, गेल्या आठ दिवसात दिड हजार नव्या इमारतींमध्ये आढळेल कोरोना रुग्ण

काही पोलिस कुटुंबांना रेंटल हाऊसिंग योजनेत स्थलांतरित करण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात चार एफएसआय मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली होती. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर हा प्रश्न आल्यानंतर त्यांनी गृहनिर्माण खात्याच्या वतीने तत्काळ एका बैठकीचे आयोजन केले.

या बैठकीला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी वर्तक नगरच्या पोलीस वसाहतीचे तत्काळ पुनर्विकास करण्याचे आदेश दिले.  म्हाडाने पोलिस वसाहतीचा पुनर्विकास करत त्यावर पोलिसांना 567 घरे मोफत बांधून द्यावीत आणि उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाने वितरीत करावीत, असे आदेशही त्यांनी दिले.

( संपादन - सुमित बागुल )

mhada to handover 567 houses to police workers jitendra awhad took decision


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mhada to handover 567 houses to police workers jitendra awhad took decision