
बापू सुळे
मुंबई : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या लॉटरीच्या अर्ज विक्रीतून म्हाडा मालामाल झाले आहे. गेल्या दीड महिन्यात तब्बल १ लाख २६ हजारहून अधिक नागरिकांनी म्हाडाच्या घरासाठी अनामत रकमेसह ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यानुसार प्रत्येक अर्जामागे म्हाडाला ५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे आज दुपारपर्यंत आलेल्या एकूण १ लाख २६ हजार अर्जाच्या माध्यमातून म्हाडाला ६ कोटी ३१ लाख रुपयांचा लाभ झाला आहे. तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत १२ सप्टेंबर असल्याने पुढील नऊ दिवस अर्जाचा ओघ सुरू राहणार असल्याने म्हाडाला मिळणाऱ्या रकमेच्या आकड्यात मोठी वाढ होणार असल्याचे दिसत आहे.