esakal | म्हाडातील अधिकारी आणि दलालांच्या भ्रष्ट युतीला जितेंद्र आव्हाडांनी दिला दणका
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

म्हाडातील अधिकारी आणि दलालांच्या भ्रष्ट युतीला जितेंद्र आव्हाडांनी दिला दणका

sakal_logo
By
- तेजस वाघमारे

मुंबई : म्हाडाच्या (MHADA) मुंबई इमारत आणि दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील अधिकारी आणि दलालांच्या भ्रष्ट युतीकडून (Agent Corruption) बृहतसूचीतील (मास्टरलिस्ट) घरांचा घोटाळा (Home Scam) अनेक वर्ष सुरु आहे. या घोटाळ्याला अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुरुंग लावला आहे. मास्टरलिस्टवरील गाळ्यांची वितरण प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत (Next Order) स्थगित ठेवण्यात यावी, असे पत्रच (Letter) गृहनिर्माण मंत्र्यांनी म्हाडाला धाडले आहे. (Mhada masterlist Agent Corruption on stay minister JItendra Awhad Action)

मुंबई इमारत आणि दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची दक्षिण आणि मध्य मुंबईत उपकार प्राप्त इमारती आहेत. जुन्या धोकादायक ठरविण्यात आलेल्या तसेच कोसळलेल्या इमारतींमधील रहिवाशांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था संक्रमण शिबिरात केली जाते. परंतु गेली कित्येक वर्षांपासून उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशी संक्रमण शिबिरात खितपत पडले आहेत. अरुंद भूखंड, रस्ता रुंदीकरण किंवा आरक्षण आदी कारणांनी इमारत पुन्हा उभारणे शक्य नसल्यास तसेच इमारतीमध्ये कमी गाळे बांधल्याने अनेकांना हक्काचे घर न मिळणाऱ्या रहिवाशांकडून मूळ कागदपत्रे मागवून त्याची बृहतसूची तयार करण्यात येते. त्यानुसार रहिवाशांना घरे वितरित केली जातात.

हेही वाचा: बापरे! मुंबई- गोवा चौपदरीकण कामादरम्यान आत्तापर्यंत २४४२ अपघाती मृत्यू

उपकार प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणारी घरे मास्टरलिस्टमध्ये समाविष्ट केली जातात. त्यामुळे मुंबईतील मोक्याच्या ठिकाणची घरे मास्टरलिस्टच्या माध्यमातून लाटण्याचे काम अधिकारी आणि दलाल करत असतात. मंडळाने सुमारे 300 घरांची यादी तयार केली असून या यादीतील घरांसाठी सोडत काढण्याची तयारी मंडळाने केली होती. याच वेळी गृहनिर्माण मंत्र्याने मास्टरलिस्टनुसार घर वितरित करण्याची प्रक्रिया करण्यास स्थगिती दिली आहे. गृहनिर्माण मंत्र्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्र्चना मंडळाचे मुख्य अधिकारी यांना पाठवलेले पत्र सकाळच्या हाती आले आहे. याबाबत मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी गृहनिर्माण मंत्र्यांनी मास्टरलिस्टबाबत पत्र पाठवले असल्याचे सांगितले.

मास्टरलिस्ट म्हणजे काय ?

मुंबई इमारत आणि दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतीतील उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू/ रहिवाशी यांना निष्कासन सूचना देऊन इमारत खाली करण्यात आलेली आहे. व त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षणमी, रस्ता रुंदीकरण इत्यादी कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झालेल्या आहेत, परंतु कमी गाळे बांधले गेले आहेत, अशा मूळ भाडेकरूंना मंडळामार्फत पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरूपी गाळा देण्यात आलेला नाही व त्यांचे वारसदार संक्रमण शिबिरात स्वतः अधिवास करत आहेत. अशा खऱ्याखुऱ्या भाडेकरूंना मास्टरलिस्टमध्ये घर देण्यात येते.

हेही वाचा: पाणी साठवा! मुंबईत १३ जुलैला 'या' भागातील पाणी पुरवठा बंद किंवा कमी दाबाने होणार

असा होतो घर घोटाळा

संक्रमण शिबिरांमध्ये खितपत पडलेल्या रहिवाशांच्या मूळ कागदपत्रांसारखी हुबेहूब बनावट कागदपत्रे तयार करण्यात येतात. बनावट कागदपत्रांचा वापर करून दलाल आणि म्हाडा अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीकडून गेली अनेक वर्षे घर घोटाळा सुरू आहे. या घरांवर दलाल आणि म्हाडा अधिकाऱ्यांचा पगडा असून घर घोटाळ्यात काही वर्षांपूर्वी मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांचा समावेश उघड झाला होता. याच विभागात मास्टरलिस्टमधील घरांसाठी अधिकारी आपली वर्णी लावून घेतात.

loading image