esakal | रायगडच्या 'या' तालुक्यातील लोकं घरं सोडून पळतायेत!
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडच्या 'या' तालुक्यातील लोकं घरं सोडून पळतायेत!

रायगड जिल्ह्याचे दक्षिणेकडील अखेरचे टोक असलेला पोलादपूर तालुका सध्या रहिवाशांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या स्थलांतरामुळे चर्चेत आहे. रोजगार, शिक्षण आदी कारणांमुळे येथील रहिवासी मुंबई, ठाण्यासह सुरत आणि जिल्ह्यात अन्य लहान-मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत.

रायगडच्या 'या' तालुक्यातील लोकं घरं सोडून पळतायेत!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्याचे दक्षिणेकडील अखेरचे टोक असलेला पोलादपूर तालुका सध्या रहिवाशांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या स्थलांतरामुळे चर्चेत आहे. रोजगार, शिक्षण आदी कारणांमुळे येथील रहिवासी मुंबई, ठाण्यासह सुरत आणि जिल्ह्यात अन्य लहान-मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबई ते ठाणे प्रवास अधिक वेगवान!

पोलादपूर तालुक्‍यातील मजबूत लाकडाचा वापर करून बैठी, आटोपशीर कौलारू किंवा पेंढा, गवताने शाकारलेली घरे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. काही ठिकाणी कुडाच्या भिंतींची सुबक घरेही दिसतात. सावरलेले अंगण, छोटसं तुळशी-वृंदावन हे गावांची शोभा वाढवणारे होते. साधारणत: ४० वर्षांपूवीची रचना अशी होती. घरासमोर एक तरी  गोठा असे. गोठ्यात गाई-बैल, वासरू अशी शेतकऱ्याकडे सात-आठ गुरे असायची. दूधदुभते होते. पाणवठे होते. भात आणि नाचणी वरीचे पीक घेण्यात येत होते. थोड्याफार फरकाने स्वयंपूर्ण अशा गावांचे चित्रण तालुक्‍यात होते. 

ही बातमी वाचली का? खासगी तेजसमुळे लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात!

हळूहळू त्याला ग्रहण लागले. विकासाचे वारे वाहू लागले. उच्च माध्यमिक विद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आले. त्यामुळे दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर मुले पदवीधर झाली; पण त्यांच्या रोजगारासाठी कोणतेही प्रयत्न तालुक्‍यात झाले नाहीत. रोजगाराची समस्या निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून स्थलांतर वाढले.  तरुणवर्गाने मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरांची वाट धरली. याचदरम्यान नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे भातशेतीसह अन्य शेती तोट्यात जाऊ लागली. आता तर गावांतील गैरसोईंना कंटाळलेले रहिवासीही गावांतून बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळेच प्रत्येक गावातील किमान ७० टक्के घरांना कुलपे लागली आहेत. गावात उरली आहेत मुलांच्या मनिऑर्डरकडे आशेने वाट पाहणारे ज्येष्ठ नागरिक.

ही बातमी वाचली का? खोपोलीत मुख्यमंत्री येणार?

पोलादपूर तालुक्‍यातील वाढते स्थलांतर ही गंभीर बाब आहे. तरुणवर्गाचे स्थलांतर रोखण्यासाठी  लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता रोजगार संधी मिळवून देण्यासाठी प्राधान्य देणार आहे.
- भरत गोगावले, आमदार

रायगड जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू झालेल्या कक्षाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक महिन्याला संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ज्या तरुणांना मूळ गावी परत यायचे आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 
- तुषार इनामदार, महाव्यवस्थापक, स्वदेश फाऊंडेशन.

पोलादपुरात रोजगाराचा प्रश्न कायम आहे. सुशिक्षित तरुण त्यामुळे मोठ्या संख्येने स्थलांतरित होत आहेत. सरकारने याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.
- सुरेश साने, ग्रामस्थ

माझे गाव पोलादपूर तालुक्‍यात दुर्गम भागात आहे. शिक्षणासाठी पाच किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तालुक्‍यात रोजगार नसल्याने स्थलांतराशिवाय पर्याय नाही.
- कोमल येरापले, तरुणी

पोलादपूर तालुक्‍यात रोजगार नाही. त्यामुळे 
गावातून स्थलांतर केले आहे. सध्या ही समस्या खूपच बिकट आहे. 
- ज्ञानोबा साने, स्थलांतरित नोकरदार

loading image