आदिवासींचे जव्हारमधून पोटापाण्यासाठी स्थलांतर; आर्थिक कोंडी कायम

नामदेव खिरारी
Monday, 26 October 2020

जून महिन्यानंतर येथील आदिवासींना कोणतेही काम नसते. थोडी शेतीची कामे असतात, तीदेखील पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सर्वत्र कोरोनाचे संकट पसरले आहे, त्यामुळे या भागातील आदिवासी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

जव्हार : जव्हार तालुक्‍यात रोजगाराची वानवा कायमच आहे. त्यातच कोरोनामुळे जवळपास आठ महिने या भागातील आदिवासी घरीच आहेत. त्यामुळे त्यांना आता अनेक अडचणी उद्‌भवत आहेत. त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. दिवाळी जवळ आल्याने हाताला मिळेल ते काम करण्यासाठी आदिवासी बांधव आता शहराकडे धाव घेत आहेत. जव्हारमध्ये रोजगारासाठी आदिवासींचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. 

हे ही वाचा : फेक टीआरपी प्रकरण! कोलवडेला पोलिस कोठडी मिश्राला जामीन; आतापर्यंत 10 जण ताब्यात 

तालुक्‍यात अनेक वर्षांपासून रोजगाराची ओरड सुरू आहे. जव्हार तालुक्‍यातील लोकसंख्या एक लाखाच्या घरात पोहोचली आहे. येथील आदिवासी रोजगार नसल्याने शेठ, सावकारांकडे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतात; मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे या आदिवासी बांधवांसमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. यामुळे आदिवासींनी दिवाळीत हातात किमान पैसा असावा यासाठी शहरी भागात स्थलांतर सुरू केले आहे. भातकापणी, बांधकाम, रेतीबंदर, गवत कापणी अशी जी कामे मिळतील त्या कामांसाठी हे आदिवासी बांधव वाडा, डहाणू, पालघर, ठाणे, भिवंडी, वसई या शहरांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे जव्हारच्या बसस्थानकावर स्थलांतर करणाऱ्यांची गर्दी होत आहे. 

नक्की वाचा : वीजपुरवठा खंडित प्रकरण! ऊर्जामंत्र्यांकडून ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्राची पाहणी

जून महिन्यानंतर येथील आदिवासींना कोणतेही काम नसते. थोडी शेतीची कामे असतात, तीदेखील पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सर्वत्र कोरोनाचे संकट पसरले आहे, त्यामुळे या भागातील आदिवासी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तालुक्‍यातील अनेकांनी रोजगाराची मागणी केली आहे, परंतु रोजगारच उपलब्ध नसल्याने आदिवासी बांधवांकडे शहरात रोजगारासाठी जाणे हाच पर्याय शिल्लक असल्याचे दिसते. 

 

आम्हाला आमच्या भागात कोणतेही काम नाही. दिवाळीचा सण जवळ आला आहे. सण साजरा करायला हातात दोन पैसे असावेत यासाठी कामाला जात आहे. रोजगाराचे रडगाणे कायमच आहे. 
- चंदर खरपडे, मजूर 

जव्हार तालुक्‍यातील आदिवासींवर आमचा व्यवसाय सुरू आहे. आज गेले सातआठ महिने त्यांना रोजगार नाही, त्याचा फटका आम्हा व्यापारीवर्गाला मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे. 
- भरत बेंद्रे, व्यापारी, गांधी चौक 

Migration of tribals from Jawahar for subsistence


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migration of tribals from Jawahar for subsistence