esakal | मंत्र्यांनी पोटनिवडणूक केली प्रतिष्ठेची
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मंत्र्यांनी पोटनिवडणूक केली प्रतिष्ठेची

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : कुठलीही पोटनिवडणूक असली तर तिला राजकीय पक्षांकडून विशेष महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे अशा निवडणुकीपासून राज्यातील आणि केंद्रातील मंत्री लांबच राहतात. मात्र पालघर जिल्ह्यात होत असलेली पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली असून भाजपकडून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, शिवसेनेकडून राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, तर काँग्रेसकडून नाना पटोले आपल्या पक्षांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री मुसळधार पावसातही मतदार, कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या १५, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या जागांसाठी ७४, तर पंचायत समितीच्या जागांसाठी ७० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक राजकीय पक्षांनी युती अथवा आघाडी न करता स्वबळाचा नारा देत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जिल्ह्यातील आपली ताकद किती आहे, हे या निमित्ताने पडताळून पाहत आहेत.
निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेते केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते हुसेन दलवाई, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, तर शिवसेनेचे राज्य मंत्रिमंडळातील कृषिमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सक्रिय झाले आहेत. या नेत्यांनी गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाही रात्री उशिरापर्यंत प्रचार सभा, कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.

हेही वाचा: भाजप नेते सामंतांच्या भेटीला ; राजकीय चर्चेला उधान

भाजप-शिवसेना संघर्षाची आठवण
२०१७-१८ मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ईरेला पेटलेल्या शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचार शिगेला पोहोचवला होता. हा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या संघर्षाची आठवण पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मतदारांना येत आहे.

loading image
go to top